नागपूर : विविध गटांमध्ये विखुरलेल्या रिपाइं पक्षाचे एकीकरण व्हावे, यासाठी नेहमीच अग्रेसर असलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अखेर ऐक्याचा नाद सोडला. शनिवारी नागपुरात पत्रपरिषदेत त्यांनी ही बाब स्पष्ट केली. रिपाइंच्या ऐक्याकडे आता जास्त लक्ष न देता स्वत:चा पक्ष देशभरात वाढविण्यावर आपला जास्त भर राहील, असे स्पष्ट केले. रिपाइंसोबत युवकांना जोडण्यासाठी दलित पँथर पुन्हा सक्रिय करणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी जाहीर केले. (Ramdas Athavale leaved the fond of Republican unity)
शेतकरी कायद्यासंदर्भात आठवले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून, ते बदलविणे शक्य नाही. कायद्यात काही बदल करायचा असेल तर ती सूचना मान्य करता येईल. या कायद्याला केवळ काही राज्यांतील शेतकरीच विरोध करीत आहेत. मोदी सरकार हे सबका साथ सबका विकास, या धोरणावर काम करीत आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या काळात जन-धन योजना, मुद्रा लोन आदी योजनांमध्ये किती लोकांना लाभ मिळाला, याची आकडेवारीही जाहीर केली. अनुसूचित जातीच्या बजेटमध्ये वाढ झाल्याचेही स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशातील निवडणुकीत रिपाइं भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील अनुसूचित जातीच्या मतदारांवर मायावतींचा अधिकार नाही. ते मतदार पूर्वी रिपाइंचेच असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेत प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, राजन वाघमारे, बाळू घरडे, सतीश तांबे, मनोज मेश्राम उपस्थित होते.
दीक्षाभूमीचे ६० काेटी महाविकास आघाडीने तातडीने द्यावेत
भाजप सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या काळात दीक्षाभूमीच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून ४० कोटी रुपये दिले होते. उर्वरित ६० कोटी रुपये राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तातडीने दीक्षाभूमीच्या विकासासाठी द्यावेत, अशी मागणीसुद्धा आठवले यांनी यावेळी केली.