लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांत रालोआची सत्ता आली तर पुढील पंतप्रधान कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र २०१९ ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढत आहोत आणि पुढील पाच वर्षेदेखील तेच पंतप्रधान राहतील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. नागपुरात रविभवन येथे पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.रालोआला लोकसभा निवडणुकांत २६० हून अधिक जागा मिळतील व नरेंद्र मोदी हेच पुढील पंतप्रधान राहतील. नितीन गडकरी हे अतिशय कर्तृत्ववान मंत्री आहेत व पुढील कार्यकाळदेखील दमदार असेल. पाच वर्षांनंतर पंतप्रधानपदासाठी गडकरी यांंचे नाव आले तर चांगलीच गोष्ट असेल, असे आठवले म्हणाले. लोकसभा निवडणुकांत ईशान्येकडील राज्य, पश्चिम बंगाल येथे रालोआच्या जागा वाढतील. विरोधकांमध्ये एकमत नाही. शिवाय पंतप्रधान बनण्यासाठी त्यांच्या गटातील अनेक जण इच्छुक आहेत. एकमत नाही ते निवडणुकांत काय विजय मिळविणार, असे आठवले यांनी प्रतिपादन केले.मुलायमसिंहांच्या वक्तव्यामुळे सपा-बसपाला फटकालोकसभेत मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या आघाडीला फटका बसेल. मुलायमसिंह हे मुरलेले राजकारणी आहेत. प्रत्येक गोष्ट ते विचारपूर्वक बोलतात. उत्तर प्रदेशमध्ये त्यांना मानणारे मोठ्या प्रमाणावर लोक आहेत. अखिलेशनी वडिलांना बाजूला सारत पक्षाची सूत्रे स्वत:कडे घेतली होती. सपाचे जुने नेते सपा-बसपा या आघाडीमुळे नाराज आहेत. निवडणुकांच्या वेळी ही नाराजी स्पष्टपणे दिसून येईल, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. मुलायमसिंह यांनी मोदींबाबत जी भावना व्यक्त केली, ती संपूर्ण देशाच्या मनातील आहे. मुलायम यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणखी मजबूत झाली आहे, असेदेखील ते म्हणाले.आंबेडकरांनी महायुतीत यावेयावेळी आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांवरदेखील भाष्य केले. बहुजन वंंचित आघाडीच्या माध्यमातून आंबेडकर भाजपाला अप्रत्यक्ष फायदाच पोहोचवत आहेत. सभेला होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तीत होत नसते हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घ्यावे. एआयएमआयएम सारख्या हिंदूविरोधी पक्षासोबत राहुन त्यांच्या पदरी पराभवच पडणार आहे. त्यापेक्षा त्यांनी थेट महायुतीत समाविष्ट व्हावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.दक्षिण-मध्य मुंबईची जागा हवीरालोआतील घटक पक्षांच्या युतीवर भाष्य करताना आठवले म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेने मतभेदांना तिलांजली देऊन एकत्र येण्याची गरज आहे. स्वत:साठी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या दक्षिण-मध्य मुंबईतील लोकसभेच्या जागेची मागणी केली आहे. तसेच या जागेच्या मोबदल्यात भाजपच्या कोट्यातून आपण शिवसेनेला दुसरी जागा मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले.