नागपूर : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत रिपाईच्या वतीने तीन जागांची आणि विधानसभेत १० ते १५ जागा मिळाव्यात यासाठी रिपाईचे प्रयत्न सुरु असून भाजपा नेते नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी बोलणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ विस्तारात रिपाईला एक मंत्रीपद देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
रविभवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, लोकसभेत रिपाईच्या महाराष्ट्रात दोन जागा निवडून आल्यास पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. त्यासाठी महाराष्ट्रात तीन जागा मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझा राज्यसभेचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपत आहे. परंतु संधी मिळाल्यास शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्यास इच्छुक आहोत. इतर दोन जागा कोठून लढायचा याचा निर्णय पदाधिकाऱ्यांशी बोलून घेण्यात येईल.
महाराष्ट्रात विधानसभेच्या १० ते १५ जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सध्या एका मंत्र्याकडे पाच ते सहा खाते आहेत. त्यामुळे रिपाईला एक मंत्रीपद मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्री पदाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दलित पँथर ही सामाजिक संघटना असून संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून दलित पँथर रिपाईची विंग म्हणून कार्य करू शकते का याचा निर्णय पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोदींनाच बहुमत मिळणार
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नेतृत्वात एनडीएच बहुमताने सत्तेत येणार असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, त्यासाठी सर्व घटक पक्ष मिळून प्रयत्न करणार आहोत. विरोधक कितीही एकत्र आले तरी मोदींना हरविणे अशक्य आहे. सर्व सामान्यांच्या हितासाठी मोदी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. अमेरिकेत राहुल गांधींनी मोदींविरोधात भूमिका मांडणे चुकीचे आहे. नवे संसद भवन मोदींनीच बांधल्यामुळे त्यांनीच त्याचे उद्घाटन करावे हा एनडीएचा निर्णय होता. ओडीशातील रेल्वे अपघातात पंतप्रधान, रेल्वे मंत्री परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात येत असून विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये. महाराष्ट्रात दररोज संजय राऊत, अजित पवार ऐकमेकांवर आरोप करीत असून त्यांनी हे आरोप-प्रत्यारोप थांबविण्याची गरज आहे.