लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांच्या न्यायालयाने रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा वॉर्ड बॉय महेंद्र रतनलाल रंगारी (२८) याला भादंविच्या कलम ३८१ (कर्मचाऱ्याने चोरी करणे) अंतर्गत दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. नागपुरातील रेमडेसिविर काळाबाजाराशी संबंधित खटल्यांमधील हा पहिला निर्णय होय.
आरोपीला भादंवि कलम १८८ (सरकारी आदेशाचे उल्लंघन) व अत्यावश्यक वस्तू कायद्यातील कलम ३ व ७ अंतर्गतच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले. सरकार पक्षाला हे गुन्हे सिद्ध करता आले नाही. त्यांनी आरोपीविरुद्ध १२ साक्षीदार तपासले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेमडेसिविर काळाबाजाराशी संबंधित खटले वेगात निकाली काढण्याचा आदेश दिल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा खटला केवळ २ महिने २० दिवसात निकाली काढला.
आरोपी रंगारी ओजस कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत होता. त्याने १७ एप्रिल २०२१ रोजी एका रुग्णाकडील इंजेक्शन चोरले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो चोरी करताना दिसून आला. सेंटर व्यवस्थापकाने रंगारीविरुद्ध तक्रार नोंदवली होती.
आरोपीला जामीन मंजूर
आरोपीने सत्र न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने कायदेशीर बाबी लक्षात घेता तो मंजूर करून शिक्षेवर अंतरिम स्थगिती दिली व आरोपीला १५ हजार रुपयाचे वैयक्तिक बंधपत्र सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.