- विदर्भ साहित्य संघाच्या सभेत मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारंपरिक रंगकर्माची परंपरा जपत पुढे नेणारा रंगधर्मी म्हणून रमेश अंभईकरांची स्वतंत्र ओळख असल्याची भावना विदर्भ साहित्य संघाच्या श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केली.
काहीच दिवसांपूर्वी विदर्भातील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व पुरुषोत्तम दारव्हेकरांचे पट्टशिष्य रमेश अंभईकर यांचे निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात शनिवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ रंगकर्मी व अंभईकरांचे साथिदार अजित दिवाडकर व गणेश नायडू उपस्थित होते.
भरतमुनींच्या नाट्यपरंपरेला जपत, ती परंपरा आपल्यातील कौशल्याने पुढे नेण्याचे कर्तृत्व अंभईकरांमध्ये होते आणि म्हणूनच त्यांची नाट्यदिग्दर्शक म्हणून स्वतंत्र ओळख असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. नाटकाच्या संहितेला प्रयोगाचा धर्म शिकविण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. साहित्य, संहिता व संगीताचा योग त्यांनी उत्तम साधल्याची भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी डॉ. विनय वैद्य अंभईकरांच्या आठवणीत रमले. त्यांच्यासोबतच सप्तकचे डॉ. उदय गुप्ते, प्रसिद्ध नाट्यलेखक डॉ. पराग घोंगे, ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला पोलकमवार-आंबोणे, बापू उपाख्य अनिल चनाखेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे निवेदन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.
...................