लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ)पदाचा डॉ. रामनाथ सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या सचिवपदी करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या स्थापनेपासून ते सीईओ पदावर कार्यरत होते. ते शुक्रवारी मुंबईला आपल्या नवीन पदावर रुजू होतील.पत्रकारांशी चर्चा करताना सोनवणे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात विविध पदाची जबाबदारी सांभाळताना सेवानिवृत्तीला दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असताना महापालिकेत अपर आयुक्तपदी बदली झाली. या पदावर मी समाधानी नव्हतो. परंतु नागपुरातील नागरिक व नेत्यांमुळे या शहराविषयी आपुलकी निर्माण झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पाची जबाबदारी मिळाली. हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला. माझ्या कार्यकाळात नागपूरचे स्मार्ट सिटी प्रकल्पात देशातील १०० शहरात अव्वल दोन क्रमांकावर स्थान कायम आहे. परंतु स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासंदर्भात मी समाधानी नाही.कायदेशीर व दीर्घ प्रक्रियेतून हा प्रकल्प जात आहे. त्यात अवकाळी पाऊस याचा फटका प्रकल्पाला बसत आहे. पूर्णक्षमतेने प्रकल्पाचे काम करण्यात अडचणी येत आहेत. येणाऱ्या नवीन सीईओ यांच्यापुढेही हे आव्हान राहणार आहे. याही परिस्थितीत या प्रकल्पाला रुळावर आणण्याचे प्रयत्न केल्याचे सोनवणे म्हणाले.सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे १८०० गुन्ह्यांचा उलगडा झाला. यातील ९० गुन्हे खुनाचे आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पातील ५२ पैकी १६ रस्ते, ४ जलकुंभ, २८ पैकी ९ पुलांचे काम सुरू आहे. लवकरच १ हजार फ्लॅटचे काम सुरू केले जाणार आहे. जून २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. यात एकूण २१ प्रकल्पांचा समावेश आहे. यातील दोन पूर्ण झाले असून, दोन प्रगतिपथावर आहेत.स्मार्ट सिटी प्रकल्पातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. आलेल्या आक्षेपांवर लवादाच्या माध्यमातून सुनावणी झाली. दोन हजार कुटुंब या प्रकल्पामुळे बाधित होत आहेत. यातील एक हजार लोकांसाठी घरकूल योजना राबविली जाणार आहे. ज्यांना रोख मोबदला हवा आहे, त्यांना तो दिला जात असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.खात्यात २५४ कोटी जमाप्रकल्पासाठी निधीची कमी नाही. खात्यात २५४ कोटी जमा आहेत. दरवर्षी २०० कोटींचा निधी मिळणार आहे. उपलब्ध निधी खर्च न झाल्याने नवीन मिळाला नाही. केंद्र सरकारकडून मिळालेले १९६ कोटी पूर्ण खर्च झाले. राज्याकडून १४३ कोटी मिळाले. यातील २० कोटी खर्च झाले. नासुप्रकडून १०० कोटी मिळाले. आजवर सेफ अॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पावर १०३ कोटी, रस्ते बांधकामावर ६५ कोटी तर घरकुलांवर १२ कोटी खर्च झाल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.
रामनाथ सोनवणे यांचा स्मार्ट सिटी सीईओ पदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:20 PM
नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ)पदाचा डॉ. रामनाथ सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे.
ठळक मुद्देमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण सचिवपदी नियुक्ती