दोन जण जखमी : कांद्री मॅगनीज खाणीत कामगारदिनीच दुर्दैवी घटनामनसर : भूमिगत खाणीत काम करीत असतानाच दरड कोसळली आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीन कामगारांपैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. जखमी कामगारांना गंभीर दुखापत झाली नसली तरी त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. ही घटना रामटेक तालुक्यातील कांद्री येथे असलेल्या मॉयल (मॅगनीज ओर इंडिया लिमिटेड)च्या भूमिगत खाणीत कामगार दिनी अर्थात सोमवारी दुपारी १ ते १.३० वाजताच्या दरम्यान घडली. विनोद यादव (३५, रा. कांद्री, ता. रामटेक) असे मृत कामगाराचे नाव असून, सुनील उईके (३८) व सुशील कठौते (२२) दोघेही रा. कांद्री, ता. रामटेक अशी जखमी कामगारांची नावे आहेत. चौघेही इतर कामगारांसोबत भूमिगत खाणीत कामासाठी गेले. तिघेही खाणीतील चौथ्या माळ्यावर (स्टेज) काम करीत होते तर, अन्य कामगार त्यांच्या शेजारीच असलेल्या अन्य माळ्यावर काम करीत होते. मॅगनीज काढण्याचे काम सुरू असतानाच अचानक दरड (खाणीच्या आतील छत ) कोसळले. विनोद, सुनील व सुशील तिघेही ढिगाऱ्याखाली दबले. खाणीतील इतर कामगारांनी लगेच या घटनेची माहिती वाकी टाकीवरून अधिकाऱ्यांना दिली. कामगारांनी सुनील व सुशीलला लगेच बाहेर काढले. विनोद हा आत दबला असल्याने त्याला बाहेर काढण्यास वेळ लागला. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुनील व सुशीलला लगेच कांद्री येथील मॉयलच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असून, त्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यातून दोघांनाही सावरण्यास थोडा वेळ लागणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. (वार्ताहर)खाण प्रशासनाची चुप्पीया घटनेच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी खाणीच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा करण्यात आली. मात्र, कुणीही कोणत्याच प्रकारची माहिती देण्यास तयार नव्हते. एका अधिकाऱ्याने या संदर्भात मंगळवारी (दि. २) माहिती देणार असल्याचे सांगून काहीही बोलण्यास नकार दिला. कामगार संघटनेचे पदाधिकारी व इतर कामगारांना विचारणा केली असता, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे तेही काहीच बोलायला किंवा सांगायला तयार नव्हते. तिघेही मॉयलचे कायमस्वरुपी कामगार आहेत. जाळी तुटल्याची शक्यताया खाणीत कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली साधने व सुविधा पुरविल्या जातात. खाणीत वेगवेगळ्या ‘लेव्हल’ तयार केल्या आहेत. आत जाण्यासाठी तसेच परत येण्यासाठी ‘आॅटोमॅटिक लिफ्ट’ची व्यवस्था असून, आतील मॅगनीज बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. आतील कामगारांना बाहेरच्या अधिकारी किंवा कामगारांशी संपर्क साधण्यासाठी ‘वाकीटाकी’ दिली जाते. आतील छताचे दगड पडून कुणीही जखमी होऊ नये, यासाठी छताला व भिंतीला जाळी बांधलेली असते. दरड अचानक कोसळल्याने ही जाळी तुटली आणि कामगार ढिगाऱ्याखाली दबले असावे, अशी शक्यता जाणकार मंडळींनी व्यक्त केली आहे.
दरड कोसळून कामगाराचा मृत्यू
By admin | Published: May 02, 2017 1:55 AM