नरेश डोंगरे नागपूर : सरकारला दररोज लाखोंचा फटका देऊन वाळू माफिया शहरात वाळूंची तसेच गाैण आणि खनिजांची बिनबोभाट तस्करी करीत आहेत. या माफियांना शहर आणि जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची साथ आहे. दुसरीकडे महसूल आणि पोलिस विभागातील काही भ्रष्ट मंडळीही या माफियांना पाठबळ देऊन सरकारला चुना लावत आहेत.
जिल्ह्यातील रेतीघाट सध्या बंद आहे. त्यामुळे रेती तस्कर मध्य प्रदेशातील विविध घाटांवरून चोरीची रेती नागपूर शहर आणि जिल्ह्यात आणतात. रेती तस्करीचा हा गोरखधंदा मध्यरात्रीपासून पहाटे ५ वाजेपर्यंत चालतो. एकीकडे रेतीची चोरी तस्करी करून हे माफिया सरकारचा दररोज लाखो रुपयांचा महसूल चोरतात. दुसरीकडे रेतीघाट बंद असल्याचा कांगावा करून सर्वसामान्यांना दामदुप्पट दराने रेतीची विक्री करतात. अशाप्रकारे सरकारला फटका अन् सर्वसामान्यांची लूट रेती माफियांकडून सुरू आहे. त्यांना वेसण घालण्याची जबाबदारी महसूल आणि पोलिस विभागावर आहे. मात्र, या दोन्ही विभागातील काही भ्रष्ट मंडळींना हाताशी धरून रेती माफिया बिनबोभाट रेतीच्या तस्करीतून कोट्यवधींचे वारेन्यारे करीत आहेत. असाच प्रकार गिट्टी, मुरूम आदी गाैण खनिजाबाबतही आहे. या खनिजांचीही मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गाड्या शहरातील विविध भागात फिरताना दिसतात.
अधिकाऱ्यांच्या नावाने मोठी वसुली
रेती, गिट्टी आणि मुरूमाची चोरी तसेच तस्करी शहरातील सर्वांत जास्त प्रमाणात कळमना, कापसी आणि पारडी भागातून होते. प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून कारवाई होऊ नये म्हणून रेती माफियांनी या भागात आपले दलाल जागोजागी पेरले आहेत. हे दलाल काही अधिकाऱ्यांच्या सतत मागावर असतात. कळमन्यातील मनोज उर्फ मन्या हा माफियांचे नेटवर्क सांभाळतो. रेती माफियांच्या सतत संपर्कात असलेला मन्या पोलिस अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. तो अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने महिन्याला मोठी वसुली करतो.
मांडवलीनंतर झाली होती धुलाईमन्या या माफियांच्या सतत संपर्कात असतो. कुठे कोणत्या पोलिसाने रेती, मुरूम, गिट्टीची गाडी अडविल्यास मन्या स्वत: फोन करतो किंवा त्याचे दलाल तेथे पोहोचतात आणि लगेच ती गाडी सोडवून घेतात. काही दिवसांपूर्वी अशाच एका प्रकरणातील मांडवलीनंतर मन्या एका साथीदारासह कापसीच्या बारमध्ये पोहोचला होता. तेथे त्याने 'अपन सिंघम है' असे म्हणताच त्याची काहीजणांनी बेदम धुलाईदेखील केली होती. त्यानंतर मन्या काही दिवस शांत होता. आता त्याने परत माफियांची साथ देणे सुरू केले आहे.