रामटेक व कामठीत काँग्रेसचे नियोजन चुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 08:31 PM2019-10-26T20:31:58+5:302019-10-26T20:33:42+5:30

काँग्रेस नेत्यांनी रामटेक व कामठीत योग्य नियोजन केले असते, पूर्ण लक्ष दिले असते, जनमानसाचा कौल विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर कदाचित आज काँग्रेसने या दोन्ही जागा जिंकत विजयाचा षटकार मारला असता.

Ramtek and Kamthi missed the Congress planning | रामटेक व कामठीत काँग्रेसचे नियोजन चुकले

रामटेक व कामठीत काँग्रेसचे नियोजन चुकले

googlenewsNext
ठळक मुद्देउमेदवारी जाहीर करण्यास दिरंगाई : नेते ‘विनिंग मेरिट’ ओळखण्यात कमी पडले

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने यावेळी मात्र चौकार मारला. सावनेरसह उमरेड, पश्चिम नागपूर व उत्तर नागपूर जिंकले. मात्र, काँग्रेस नेत्यांनी रामटेककामठीत योग्य नियोजन केले असते, पूर्ण लक्ष दिले असते, जनमानसाचा कौल विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर कदाचित आज काँग्रेसने या दोन्ही जागा जिंकत विजयाचा षटकार मारला असता.
रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी बरीच रस्सीखेच झाली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे व उदयसिंग यादव यांच्यापैकी कुणाला तिकीट द्यावे, हा निर्णय घेण्यासाठी हायकमांडने बराच वेळ घेतला. भूमिपुत्रांचा मेळावा झाला. बरेच राजकारण झाले. भूमिपुत्र म्हणून यादव यांना संधी देण्यात आली. शेवटी निकाल लागला. शिवसेनेचे बंडखोर अ‍ॅड.आशिष जयस्वाल यांनी भाजपचे पानिपत करीत रामटेकचा गड सर केला. जयस्वाल २४ हजार ४१३ मतांनी विजयी झाले. जयस्वाल यांना ६७,४१९ तर भाजपचे डी.मल्लिकार्जून रेड्डी यांना ४३ हजार ०६ मते मिळाली. काँग्रेसचे यादव तिसऱ्या क्रमांकावर घसरले. त्यांना ३२ हजार ४९७ मतावर समाधान मानावे लागले.
आता जनमानसात निकालाचे पोस्टमार्टम करणे सुरू झाले आहे. रामटेकमध्ये काँग्रेसने राजेंद्र मुळक किंवा चंद्रपाल चौकसे यांना संधी दिली असती तर चित्र काहिसे चांगले असते का, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. जिल्हाध्यक्ष मुळक हे रामटेकमध्ये दोन वर्षांपासून काम करीत होते. त्यांनी प्रत्येक गावात, बूथपर्यंत संपर्क प्रस्थापित केला होता. शिवाय निवडणूक लढण्याची कला त्यांना अवगत होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. काँग्रेस नेते चंद्रपाल चौकसे हे देखील गेल्या पाच वर्षांपासून रामटेकमध्ये परिश्रम घेत होते. जलदिंडी, आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहचत होते. शिवाय गेल्या दोन टर्ममध्ये काँग्रेसचे तिकीट न मिळाल्यावरही त्यांनी बंडखोरी केली नाही. प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. असे असतानाही यावेळी काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीचा विचार केला नाही. काँग्रेसने काही अंदाज घेऊनच यादव यांना विचारपूर्वकच उमेदवारी दिली असेल. मात्र, निकाल पाहता पक्षाचा अंदाज चुकलेला दिसतो.
कामठीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट पक्के मानले जात होते. बावनकुळे यांचे तिकीट कटेल, असा विचार विरोधकांनीही स्वप्नात केला नव्हता. त्यामुळे काँग्रेसच्या हायकमांडने दोन महिन्यांपूर्वीच या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित करणे आवश्यक होते. यामुळे उमेदवाराला भाजपचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असता. मात्र, झाले उलटे. दोन महिन्यापूर्वी तर सोडाच पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवसांपूर्वीपर्यंत काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भोयर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे भोयर यांना उमेदवार म्हणून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही.
कामठीत भाजपचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापल्यामुळे समर्थकांमध्ये रोष होता. हा रोष मतांमध्ये परावर्तित करण्यात काँग्रेस नेते कमी पडले. भोयर यांना पक्षाच्या नेत्यांकडून पाहिजे तशी मदत मिळाली नाही. गेल्यावेळी राजेंद्र मुळक यांना कामठीतून आघाडी घेतली होती. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी भोयर यांच्यासाठी नियोजन केले असते तर कदाचित भोयर यांनीही कामठीत हात मारला असता, अशी आता मतदारांमध्ये चर्चा आहे.

Web Title: Ramtek and Kamthi missed the Congress planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.