नागपूर : रामटेक मतदारसंघ महाविकास आघाडीत उद्धवसेनेला, तर उमरेड काँग्रेसला सुटला आहे. रामटेकमध्ये उद्धवसेनेचे विशाल बरबटे, तर उमरेडमध्ये काँग्रेसचे संजय मेश्राम उमेदवार आहेत. बरबटे यांच्या विरोधात बंडखोरी करीत काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी दंड थोपटले आहेत. मात्र, मुळक यांना विजयी करण्याचे आवाहन करीत सोमवारी रामटेक विधानसभा मतदारसंघात पदयात्रा आणि प्रचार सभा घेत रामटेकचे काँग्रेसचे खा. श्यामकुमार बर्वे व माजी मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसलाच उघड चॅलेंज दिले आहे. इकडे काँग्रेसचे निलंबित जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी उमरेड येथे सभा घेत काँग्रेसचे संजय मेश्राम यांच्या विजयाचा संकल्प केला. त्यामुळे महाविकास आघाडीत राज्यस्तरावर काहीही निर्णय होत असले तरी मुळक, बर्वे आणि केदार यांच्या या भूमिकेमुळे रामटेक आणि उमरेडमध्ये चाललंय तरी काय, अशा प्रतिक्रिया काँग्रेसच्या गोटातून उमटत आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले होते. त्यांनी कारवाईचाही इशारा दिला होता. यानुसार रामटेक मतदारसंघात बंडखोरी करीत निवडणूक लढविणारे काँग्रेसचे राजेंद्र मुळक व चंद्रपाल चौकसे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मात्र, सोमवारी खा. श्यामकुमार बर्वे, सुनील केदार, रश्मी बर्वे यांच्यासह केदार गटाचे कार्यकर्ते मुळक यांच्या प्रचारासाठी मौदा आणि पारशिवनी तालुक्यात दाखल झाले. त्यांनी सकाळी रेवराल पंचायत समिती गणातील विविध गावांत पदयात्रा करीत मुळक यांच्या विजयाचे आवाहन केले. यावेळी जि. प. सदस्य तापेश्वर वैद्य, शालिनी देशमुख, दूधराम सव्वालाखे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे, पंचायत समिती सभापती स्वप्निल श्रावणकर, पंचायत समिती सदस्य दुर्गा ठाकरे, दीपक गेडाम, ज्ञानेश्वर वानखेडे, राजेंद्र लांडे, चिंतामण मदनकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
आम्ही बरबटेंशी कोणतीही गद्दारी केली नाही : बर्वे
ज्यांनी तुम्हाला चार चार वेळा आमदार केलं, ते उद्धव ठाकरे बेडवर असताना तुम्ही त्यांच्याशी गद्दारी केली, असा सवाल करीत खा. श्यामकुमार बर्वे यांनी शिंदेसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांच्यावर टीका केली. आमची निष्ठा काँग्रेसशी आहे. आम्ही विशाल बरबटेंशी कोणतीही गद्दारी केली नाही. रामटेकच्या लोकांनी सांगितलं की मुळक यांच्याशिवाय येथे पर्याय नाही. त्यामुळे लोकभावनेचा आदर करीत आम्ही मुळक यांच्यासोबत आहोत. राजेंद्र मुळक हे जिंकून आल्यानंतर आपल्यासोबतच राहतील, असा विश्वासही बर्वे यांनी पारशिवनी येथील सभेत व्यक्त केला.