नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात मोठा ‘पोलिटिकल ड्रामा’ घडल्यानंतर रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले उमरेडचे आमदार राजू पारवे व काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे काँग्रेसकडून रिंगणात उतरलेले त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांच्यात काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत.
बंडखोरी करीत अर्ज भरणारे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) सुरेश साखरे व काँग्रेसचे नरेश बर्वे यांनी माघार घेतली असून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी मात्र उमेदवारी कायम ठेवत दंड थोपटले आहेत. उलथापालथीमुळे राजकीय वातावरण तापले असून रामटेकची निवडणूक ‘हॉट’ होताना दिसतेय. त्याची धग प्रचारात जाणवू लागली आहे.
रामटेक मतदारसंघांत एकूण ४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ६ अर्ज अवैध ठरले. बुधवारी अखेरच्या दिवशी ७ उमेदवारांनी माघार घेतली. आता एकूण २८ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने पुढाकार घेत काँग्रेस आमदाराच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण दिला. तिकीट कटल्यामुळे दुखावलेले खा. कृपाल तुमाने यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत तुमाने यांना कामाला लावले. काँग्रेसच्या मुख्य दावेदार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. माजी मंत्री सुनील केदार यांचे खंदे समर्थक राहिलेले जि.प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. असे एकामागून एक आघात काँग्रेसला सहन करावे लागत आहेत. या धक्क्यांना सामोरे जात काँग्रेस तेवढ्याच जिद्दीने कामाला लागली आहे. नेते गेले तरी मतदार आपल्या सोबत आहेत, असा दावा काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये व नरेश बर्वे यांच्यासह शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र सुरेश साखरे व नरेश बर्वे यांनी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेत आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत असल्याचे स्पष्ट केले. तर किशोर गजभिये यांनी मात्र अर्ज कायम ठेवत काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामाही दिला आहे. कुटुंबातील उमेदवार उभा असल्यामुळे आपण माघार घेतली, असे नरेश बर्वे म्हणाले. तर, आपल्याला ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले. आपली नाराजी दूर झाली असून काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार करू, असे सुरेश साखरे यांनी सांगितले. शनिवारी गौरव गायगवळी, दर्शनी धवड, प्रकाश कटारे, डॉ. विनोद रंगारी, संदीप गायकवाड यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले.
----------
काँग्रेसने अन्याय केला- काँग्रेसने उमेदवारी नाकारून आपल्यावर अन्याय केला. गेल्या निवडणुकीत आपण काँग्रेसकडून चांगली लढत दिली. पराभवानंतरही मतदारसंघात संपर्क ठेवला, राज्यात काँग्रेसचा विचार मांडला. त्यानंतरही माझे तिकीट कापण्यात आले. यामुळे सर्वच समाजात नाराजी आहे. जनतेच्या आग्रहास्तव आपण ही निवडणूक लढवित आहोत.
- किशोर गजभिये, अपक्ष उमेदवार
बसपा, वंचित, गजभियेंच्या मतांवर काँग्रेसचे गणित
- बसपाकडून जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम तर वंचित बहुजन आघाडीकडून भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे रिंगणात आहेत. २०१९ च्या निवडणुकीत बसपाने ४४, ३२७ तर वंचितने ३६, ३४० मते घेतली होती. दोन्ही पक्षांनी मिळून ८० हजारावर मते घेतली. यावेळी बसपा व वंचित मिळून किती मते घेतात व काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यावर किशोर गजभिये यांना किती मते मिळतात यावर काँग्रेसचे विजयाचे समीकरण अवलंबून आहे.