मनाेज जयस्वाल
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिवराबाजार : रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराची अवस्था बकाल झाली आहे. येथे साफसफाईचा अभाव असल्याने ठिकठिकाणी कचरा व टाकाऊ भाजीपाल्याचे ढीग दिसून येतात. त्या सडक्या भाजीपाल्यावर माेकाट गुरांचा वावर असताे. शिवाय, डासांची पैदास हाेत असल्याने येथे येणाऱ्या शेतकऱ्यांसह दलाल, हमाल, मापारी, ग्राहक यांच्यासह इतरांना मलेरिया व तत्सम कीटकजन्य आजार हाेण्याची शक्यता बळावली आहे.
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आठवड्यातून पाच दिवस भाजीपाल्याचा लिलाव हाेत असल्याने रामटेक, पारशिवनी व माैदा तालुक्यातील १५० ते १७० शेतकरी या ठिकाणी त्यांच्याकडील भाजीपाला विकायला आणतात. भाजीपाला खरेदी करण्यासाठी ५० परवानाधारक व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात त्यांचे ठिय्ये तयार केले आहेत.
भाजीपाला खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर टाकाऊ भाजीपाला तिथे आवारात टाकून दिला जाताे. या भाजीपाला व कचऱ्याची नियमित उचल केली जात नसल्याने हा कचरा तिथेच पडून राहताे. पाऊस व दमट वातावरणामुळे नाशिवंत भाजीपाला लवकर सडताे. त्यामुळे या आवाराच्या काही भागात सडलेल्या भाजीपाल्याची दुर्गंधीही येते. हा प्रकार सर्वांच्याच आराेग्याला हानीकारक असल्याने बाजार समितीच्या आवाराची नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे.
...
१४ ते २१ गाड्या भाजीपाल्याची आवक
या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राेज १४ ते २१ गाड्या (मेटॅडाेर, ट्रॅक्टर, छाेटी मालवाहू वाहने) भाजीपाल्याची आवक आहे. येथे भाजीपाल्याचा लिलाव तसेच ठाेक व घाऊक (किरकाेळ) विक्री सकाळी ६ वाजतापासून दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असते. भाजीपाला खरेदी करण्यासाठी ४०० ते ४५० किरकाेळ भाजीपाला विक्रेते आणि १०० ते १२५ नागरिक स्वस्तात भाजीपाला मिळताे म्हणून खरेदी करण्यासाठी या कृषी उत्पन्न समितीच्या आवारात येतात.
...
मूलभूत सुविधांचा अभाव
रामटेक बाजार समितीची वार्षिक उलाढाल एक काेटी रुपयांपेक्षा अधिक आहे. बाजार समितीला वर्षाकाठी भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीतून किमान १२ ते १३ लाख रुपयांचे तर धान्याच्या खरेदी विक्रीतून ३५ ते ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव हनुमंत महाजन यांनी दिली. तुलनेत बाजार समितीच्या आवारात काही मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येताे. त्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ मुतारी, शाैचालये यांसह अन्य मूलभूत सुविधांची निर्मिती करणेही गरजेचे आहे.
...
साेमवार व शुक्रवारी भाजीपाला खरेदी-विक्री व्यवहार बंद असल्याने या दाेन्ही दिवस साफसफाई केली जाते. दाेन्ही दिवस ट्रॅक्टरच्या ट्राॅली भरून सडका भाजीपाला व कचरा गाेळा करून फेकला जाताे व त्याची विल्हेवाट लावली जाते. राेजचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कचऱ्याचे थाेडेफार ढीग पडून राहतात.
- हनुमंत महाजन, सचिव,
कृषी उत्पन्न बाजार समिती, रामटेक.