रामटेक : नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांची ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बदली करण्यात आली असून, प्रभार पारशिवनी नगर पंचायतच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्याकडे साेपविला आहे, शिवाय पालिकेतील अकाऊंटंटचे पद तीन वर्षांपासून रिक्त आहे. महत्त्वाची पदे रिक्त असल्याने स्थानिक विकास कामे प्रभावित झाली आहेत.
रामटेक नगरपालिका महत्त्वाची व माेठी असून, पर्यटनस्थळामुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते. त्यातच शहरात विविध विकास कामेही सुरू आहेत. त्यातच मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांची ऑगस्टमध्ये बदली करण्यात आली असून, त्यांचा प्रभार पारशिवनीच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्याकडे साेपविला आहे. त्या आठवड्यातील दाेन दिवस रामटेक कार्यालयात येतात. काेराेना संक्रमण, शहरात सुरू असलेली विकास कामे, आर्थिक व्यवहार व नागरिकांच्या समस्या लक्षात घेता कार्यालयीन कामासाठी दाेन दिवस पुरेसे नाहीत.
या पालिकेतील अकाऊंटंटची तीन वर्षांपूर्वी कामठी नगर परिषदेत बदली करण्यात आली. त्यानंतर वारंवार मागणी करूनही कायमस्वरूपी अकाऊंटंटची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या पदाचा कारभार तीन वर्षांपासून प्रभारीच्या भरवशावर सुरू असल्याने पालिकेच्या आर्थिक व्यवहाराला विलंब हाेत आहे. शहराच्या विकासाला लागलेली खीळ लक्षात घेता, ही दाेन्ही पदे तातडीने भरण्याची मागणी पालिका पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.
---
रामटेक नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी व अकाऊंटंटची नितांत गरज आहे. या दाेन्ही अधिकाऱ्यांच्या अभावामुळे प्रशासकीय कामे व आर्थिक व्यवहाराला दिरंगाई हाेत असल्याने नागरिकांना त्रास हाेताे. विकास कामेही प्रभावित हाेतात. ही पदे भरण्यासाठी शासनाला पत्राद्वारे कळविले असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे.
- दिलीप देशमुख,
नगराध्यक्ष, रामटेक.