आॅनलाईन लोकमतनागपूर : रामटेक या ऐतिहासिक गावात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित शोभायात्रेत ‘शेतकरी आत्महत्या’ दाखविणाऱ्या चित्ररथाला सजवणाऱ्या तरुणाचा त्यातच गळफास लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना येथे गुरुवारी रात्री घडली.गळफास लागून त्या तरुणाचा मृत्यू झालेला असताना हा चित्ररथ रामटेकच्या गल्ल्यांतून फिरत होता. त्यानंतर ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली.मनोज अरुण धुर्वे (२८, रा. संग्रामपूर, ता. रामटेक, जि. नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. रामटेक येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेत विविध सामाजिक विषयांवरील चित्ररथ साकारले जाऊन समाजाचे प्रतिबिंब त्याद्वारे दर्शविले जाते. अठराभुजा गणेश मंदिरात गणेशाची पाद्यपूजा केल्यानंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास या शोभायात्रेला प्रारंभ झाला.या शोभायात्रेत धार्मिक, सामाजिक, पौराणिक आणि सांस्कृतिक विषयावरील चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. काहींनी जिवंत देखावे तयार केले. त्यापैकीच राजेश सरवर याच्या नेतृत्वात ‘कास्तकाराची आत्महत्या’ या चित्ररथात मनोज धुर्वे हा गळफास लावलेला शेतकरी म्हणून सहभागी झाला होता. बसस्टँडमार्गे शोभायात्रा आंबेडकर चौकात पोहोचली. तिथे सर्व चित्ररथांचे परीक्षण करण्यात आले. तेथून पुढे जाऊन गांधी चौकात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास चित्ररथाचे परीक्षण करीत असताना मनोज हा काहीच हालचाल करीत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयोजकांना शंका येताच त्यांनी मनोजला रुग्णालयात हलविले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ‘शेतकरी आत्महत्या’साठी त्याने उपयोगात आणलेल्या दोराचाच गळफास लागून मनोजचा मृत्यू झाला.आंबेडकर चौकापासून ही शोभायात्रा थोडी पुढे जाताच मनोजचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही शेतकरी आत्महत्या खरीखुरी असेल, असे समजून आयोजकांनी चित्ररथ गांधी चौकापर्यंत नेला, हे विशेष! या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूरजवळ रामटेकमध्ये शोभायात्रेत ‘शेतकरी आत्महत्ये’वरील चित्ररथात तरुणाचा गळफास लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 3:01 PM
रामटेक या ऐतिहासिक गावात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित शोभायात्रेत ‘शेतकरी आत्महत्या’ दाखविणाऱ्या चित्ररथाला सजवणाऱ्या तरुणाचा त्यातच गळफास लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना येथे गुरुवारी रात्री घडली.
ठळक मुद्देआत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याची भूमिका खरी ठरलीचित्ररथाचे परिक्षण करताना लक्षात आली बाब