रामटेक शिवसेनेने नव्हे, काँग्रेसनेच लढावे; मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 10:49 AM2023-06-03T10:49:57+5:302023-06-03T10:50:48+5:30
नागपुरातही पोषक वातावरण
नागपूर : जिल्ह्यात काँग्रेसचा ग्राफ वाढला आहे. वातावरणही पोषक आहे. नागपूर व रामटेक या दोन्ही जागा एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही जागा काँग्रेसनेच लढाव्या, अशी भूमिका जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत मांडली.
प्रदेश काँग्रेसतर्फे शुक्रवारी मुंबईतील टिळक भवनात आयोजित बैठकीत लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विदर्भ प्रभारी आशीष दुआ यांनी स्थानिक नेत्यांची मते ऐकून घेतली. नागपूर लोकसभेबाबत शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे व पूर्व नागपूरचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी भूमिका मांडली. आ. ठाकरे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर मतदारसंघातून लढले आहेत. लोकसभेनंतर विधानसभेत नागपूर शहरातील दोन जागा जिंकलो, दोन काठावर हरलो. आ. अभिजित वंजारी व आ. सुधाकर अडबाले यांच्या रुपात काँग्रेसच्या बाजूने निकाल लागले. त्यामुळे येथे काँग्रेसनेच लढावे, अशी मागणी आ. ठाकरे यांनी केली. पुरुषोत्तम हजारे यांनी शहर काँग्रेसने संघटन बांधणी केल्याचे सांगत कुणबी समाजाचा उमेदवार देण्याची सूचना केली. तानाजी वनवे व संजय दुबे यांनीही सर्वांना विश्वासात घेऊन, मेरिट पाहून लवकर उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली.
रामटेक लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) किंवा राष्ट्रवादीसाठी सोडली जाऊ नये. ही जागा काँग्रेसनेच लढावी, अशी आग्रही भूमिका किशोर गजभिये, माजी आ. एस.क्यु. जमा, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, रश्मी बर्वे, नरेश बर्वे, उदयसिंह यादव आदींनी मांडली. जिल्ह्यात मुळातच शिवसेनेचे अस्तित्व नाही. खा. कृपाल तुमाने हे भाजपच्या भरवशावर निवडून आले आहेत.
जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती भक्कम आहे. काँग्रेसने ५ लाखांवर मते घेतली आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक काँग्रेसने जिंकली आहे. बाजार समित्यांवर बाजी मारली. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसनेच लढावी, किमान सहा महिन्यांपूर्वी उमेदवाराची घोषणा करावी, अशी मागणी बहुतांश नेत्यांनी केली. पराभवानंतरही आपण लोकांच्या संपर्कात असल्याचे सांगत किशोर गजभिये यांनी स्वत:ची दावेदारी सादर केली. त्यावर उपस्थित नेत्यांनी ही दावेदारीची बैठक नसून स्थिती जाणून घेण्याची बैठक असल्याचे स्पष्ट केले.
बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, कुणाल राऊत, गिरीश पांडव, मुजिब पठाण, हुकुमचंद आमधरे, नरेश बर्वे, तक्षशिला वाघधरे, अवंतिका लेकुरवाळे, नरेंद्र जिचकार, मिथिलेश कन्हेरे आदी उपस्थित होते.
सर्वेक्षण करून उमेदवार ठरवा
- जिल्ह्यात काँग्रेसचे वातावरण चांगले आहे. भाजप विरोधी लाट आहे. काँग्रेसने सक्षम उमेदवार दिला निकाल बदलू शकतो. त्यामुळे पक्षाने नागपूर व रामटेक लोकसभेसाठी सर्वेक्षण करावे व मेरिटच्या आधारावर उमेदवाराची घोषणा करावी, अशी सूचना जवळपास सर्वच नेत्यांनी केली.
जिचकार-ठाकरेंचे शाब्दिक बाण
बैठकीत नरेंद्र जिचकार यांनी शहर काँग्रेस सक्रीय नसून महापालिका निवडणुकीसाठी काहीच तयारी सुरू नसल्याचा मुद्दा मांडत अप्रत्यक्षपणे आ. विकास ठाकरे यांच्यावर नेम साधला. यावर आ. ठाकरे यांनीही पक्ष संघटनेत सक्रीय नसणारे बैठकांमध्ये ज्ञान वाटतात, असा टोला लगावत भाजपच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या वादात बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्थी करीत जिचकार यांना विषयाला धरून बोलण्याची सूचना केली. विशेष म्हणजे या वेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पत्रकार परिषदेसाठी गेले असल्यामुळे उपस्थित नव्हते.