लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : सलग १४ दिवसानंतर रामटेक तालुक्यात बुधवारी (दि. २१) सरासरी २७ मिमी पाऊस काेसळला. महसूल विभागाच्या नगरधन मंडळात सर्वाधिक तर देवलापार मंडळात सर्वात कमी पावसाची नाेंद करण्यात आली. गुरुवारी (दि. २२) दिवसभर ढगाळ वातावरण असूनही फारसा पाऊस बरसला नाही. मध्यम स्वरुपाच्या या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाच्या राेवणीला सुरुवात केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात आजवर तालुक्यात ३९४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. तालुक्यात गुरुवारी सकाळपर्यंत सरासरी २७ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. यात रामटेक मंडळात २६ मिमी (आजवर एकूण ४४५ मिमी), देवलापार मंडळात २० मिमी (एकूण ३०५ मिमी), नगरधन मंडळात ३२ मिमी (एकूण ४७८ मिमी) आणि मुसेवाडी मंडळात ३० मिमी (एकूण ४१६) मिमी पाऊस काेसळला. देवलापार मंडळात घनदाट जंगल असूनही त्या भागात सर्वात कमी पाऊस काेसळला.
तालुक्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतले जाते. पावसाने दडी मारल्याने धानाच्या राेवणीची कामे थांबली हाेती. मात्र, बुधवारी मध्यम स्वरुपाचा पाऊस काेसळल्याने शेतकऱ्यांनी धानाच्या राेवणीला वेग दिला आहे. त्यातच पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी जलाशयातील पाणी कालव्यात साेडले जात असल्याने राेवणीचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. या जलाशयातून डाव्या कालव्यात १,८०० क्यूसेक तर उजव्या कालव्यात १६० क्यूसेक पाणी १० जुलैपासून साेडले जात असल्याची माहिती पेंच पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता राजू भोमले यांनी दिली. धानाच्या राेवणीला सुरुवात झाल्याने ग्रामीण भागातील मजुरांनाही कामे मिळाली आहेत.
...
खिंडसी जलाशयात चार टक्के पाणीवाढ
बुधवारी काेसळलेल्या पावसामुळे रामटेक शहरानजीकच्या खिंडसी जलाशयात चार टक्क्यांनी पाण्याची वाढ झाली आहे. पारशिवनी तालुक्यातील पेच नदीवरील नवेगाव खैरी व रामटेक तालुक्यातील ताेतलाडाेह जलाशयातील पाणीसाठ्यात मात्र वाढ झाली नाही. मध्य प्रदेशातील चाैराई धरणातील पाणी साेडल्यानंतर या दाेन्ही जलाशयातील पाण्यात वाढ हाेते. या दाेन्ही जलाशयांमध्ये मागील वर्षी याच काळात सरासरी ७६ टक्के साठा हाेता. खिंडसी जलाशयात ३० टक्के (३१ दलघमी), नवेगाव खैरी जलाशयात ६४.८० (९२ दलघमी) आणि तोतलाडोह जलाशयात ५९.३९ टक्के (६०३ दलघमी) पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता राजू भोमले यांनी दिली.