- कमलेश वानखेडेनागपूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शनिवारी सुरू झालेल्या शिवसंकल्प यात्रेतून नागपूर व यवतमाळ-वाशिम हे दोन लोकसभा मतदारसंघ वगळण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी जाहीर झालेल्या कार्यक्रमात या दोन्ही मतदारसंघांचा समावेश होता. आता प्रत्यक्ष यात्रा निघाली असताना दोन्ही मतदारसंघाचा त्यात समावेश केला नसल्याने या मतदारसंघातील कार्यकर्त्यांध्ये अस्वस्थ झाले आहेत. विदर्भातील या महत्वाच्या दोन जागा शिंदे गटाकडून भाजपसाठी सोडल्या जातील का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेली शिवसंकल्प यात्रा ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठीच असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे १३ खासदार आले होते. त्यामुळे ही यात्रा आपल्या मतदारसंघात व्हावी, असे शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक खासदारांची इच्छा होती. मात्र आता १३ पैकी ११ मतदारसंघातच शिवसंकल्प यात्रा जात आहे. शनिवारी (६ जानेवारी) शिरुर व मावळ या दोन मतदारसंघातून ही यात्रा सुरू झाली. ८ जानेवारी रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग, १० जानेवारी रोजी हिंगोली व धाराशीव, ११ जानेवारी रोजी परभणी व छत्रपती संभाजीनगर, १३ जानेवारी रोजी अमरावती व बुलडाणा, २४ जानेवारी रोजी रायगड, तसेच २७ व २८ जानेवारी रोजी महाअधिवेशन घेऊन समारोप होणार आहे.
शिवसंकल्प यात्रेच्या पहिल्या वेळापत्रकात २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता यवतमाळ- वाशिम व त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता रामटेक मतदारसंघाचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आता नव्याने जारी झालेल्या कार्यक्रमात या दोन्ही मतदारसंघांचा समावेश नाही. यावर दोन्ही मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्षभाजपने रामटेक व यवतमाळ-वाशिम या दोन मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपचे मोठे नेतेही या दोन जागांसाठी आग्रही आहेत. यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा ईडीने नोटीस बजावली आहे. दोन-तीन जागांची अदलाबदली करण्याचा भाजपचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व घडामोडी पाहता या दोन मतदारसंघांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.