लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरात उपद्रवी माकडांचा धुमाकूळ वाढल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या माकडांनी लहान मुलासह पाच नागरिकांना चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये विशेषत: महिला व लहान मुलांमध्ये भीती पसरली आहे. दुसरीकडे ही माकडं घरावर धुमाकूळ घालत असून, वाळवणी, काैलारू घरांचे नुकसान करीत असल्याने नागरिकांची डाेकेदुखी वाढली आहे.
गेल्या दाेन दिवसात माकडाने देवा हिंगे, सुरेश पगाडे, सुखदेव मराठे, सेरानंद लिल्हारे तसेच महंत टेंभुर्णे या बालकास चावा घेऊन जखमी केले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये माकडाची दहशत निर्माण झाली आहे. माकडांचे कळप काैलारू घरे व टिनावर धुमाकूळ घालत असल्याने गाेरगरिबांच्या घराचे नुकसान हाेत आहे. ही माकडं खिडकीतून हात टाकून हातात येईल ते खातात. घरातील भाजीपाला, अन्नपदार्थ पळवून नेतात. तसेच बाजार परिसरातील किराणा व भाजीपाला दुकानातील साहित्य माकडांचे भक्ष्य ठरत आहे.
रस्त्याने ये-जा करणाऱ्या व्यक्तीकडील वस्तू तसेच दुकानातील वस्तू माकडं कधी हिसकावून नेईल, याचा नेम नाही. त्यामुळे दुकानदारांना ग्राहक सांभाळत अक्षरश: माकडांकडेही लक्ष ठेवावे लागते. रस्त्याने अचानक माकड आल्याने दुचाकीस्वारांचा गाेंधळ उडताे. शिवाय, घरासमाेर वा रस्त्यालगत उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर माकड उड्या मारत असल्याने वाहनांचे नुकसान हाेत आहे.
शहरात दिवसभर सात ते आठ माकडांचे कळप हैदाेस घालत असून, माकडांच्या उच्छादामुळे नागरिक संतापले असून, त्यांच्या जीवितास धाेका निर्माण झाला आहे. वनविभाग व नगरपालिका प्रशासनाने यावर तातडीने ताेडगा काढून माकडांचा बंदाेबस्त करणे गरजेचे झाले आहे.