नागपूर : मागील काही दिवसांपासून नागपुरात घरफोड्यांची प्रकरणे वाढली असून, नागपूरपोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी मोहीमच हाती घेतली आहे. जरीपटका, प्रतापनगर, बेलतरोडी परिसरात तब्बल १६ घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोराला राणाप्रतापनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला ओडिसातून ताब्यात घेण्यात आले असून, दोन्ही आरोपी त्याच राज्यातील आहेत. मागील काही कालावधीतील ही पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे.
प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळासाहेब अग्ने ले आऊट येथील दीपाली पाटोडे यांच्या निवासस्थानी २० मे रोजी पहाटे चोरी झाली होती. परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्रिमूर्तीनगर गजानन मंदिरच्या बाजूला शंकर सावजी हॉटेलच्या जवळ प्रशांतकुमार सुमत कराड हा पाठीवर काळ्या रंगाची बॅग लावून संशयितरीत्या जात असताना आढळून आला. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने तीन लाख ४० हजार रुपयांच्या मुद्देमालाच्या चोरीची कबुली दिली. त्याची आणखी सखोल चौकशी केली असता मागील सहा महिन्यांत त्याने शहरात १६ ठिकाणी घरफोड्या केल्याची बाब समोर आली. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींकडून एकूण ९५१ ग्रॅम सोन्यासह ३८ लाख १२ हजारांचा माल जप्त केला.
ओडिसातून दुसऱ्या आरोपीला सिनेस्टाईल अटक
प्रशांतकुमार चोरी करून लगेच नागपुरातून निघून जायचा व ओडिसा येथे श्रीकांत शेट्टी हा दागिन्यांची विल्हेवाट लावण्यास मदत करायचा. शेट्टीला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस सापळा रचला. मात्र, तो सापडला नाही. त्याचा घरचा पत्तादेखील माहिती नव्हता. अखेर त्याच्या नावाच्या आधारे फेसबुकवरून माहिती काढण्यात आली व त्यानंतर बॅंक खाते आणि मोबाईल क्रमांक प्राप्त झाले. मोबाईलचे लोकेशन काढून भुवनेश्वरपासून ३५० किलोमीटर अंतरावरून त्याला ताब्यात घेण्यात आले.
कोलकात्यात करायचा ऐशआराम
आरोपी प्रशांतकुमार हा भुवनेश्वरहून रेल्वेने रायपूरमार्गे नागपुरात यायचा. संबंधित ठिकाणाची रेकी करून तो ‘टार्गेट’ निश्चित करायचा. रात्रीच चोरी करून तो परत ओडिसाकडे निघून जायचा. चोरीचा माल विकल्यावर मिळालेल्या पैशांतून ऐशआरामासाठी तो कोलकाता गाठायचा. तेथे तारांकित हॉटेलमध्ये राहून डान्स बारमध्ये पैसे उडवायचा. शिवाय लक्झरी लाईफस्टाईल जगायचा, असे तपासात समोर आले आहे. प्रशांतकुमारने हा सराईत गुन्हेगार असून, याअगोदरदेखील त्याने विविध राज्यांत घरफोडी केल्या आहेत.
नागपुरात येथे केल्या घरफोड्या
पोलीस ठाणे हद्द : घरफोड्या
राणाप्रतापनगर : ७
बेलतरोडी : ६
जरीपटका : ३