रेवराल : कार्यालयीन वेळ शासकीय कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे करावी, असे अभिप्रेत आहेत. मात्र, मौदा तालुक्यातील काही ग्रामसेवकांची बुधवारी रामटेक येथे झालेली पार्टी (स्नेहमिलन सोहळा) सध्या चर्चेचा विषय झाला आहे. मौदा पंचायत समिती अंतर्गत ६२ ग्रामपंचायत आहे. येथे ३१ ग्रामसेवक व ७ ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी ४ ग्रामसेवक विविध कारणास्तव रजेवर आहेत. मात्र, बुधवारी तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी कार्यालयीन कामकाजाला दांडी मारून रामटेक येथील एका रिसॉर्टमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. याबाबत चाहूल लागताच खंडाळा येथील उपसरपंच संकेत झाडे, नेरला येथील उपसरपंच मनोज कडू, ग्रामपंचायत सदस्य रोशन मेश्राम तसेच निसतखेडा येथील उपसरपंच राकेश चव्हाण यांनी संबंधित रिसॉर्टला भेट दिली असता तालुक्यातील बहुतांश कर्मचारीवर्ग पार्टीमध्ये मग्न असल्याचे दिसून आले. यामध्ये काही अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश होता.
- रामटेकला पार्टी असल्याबाबत मला कल्पना नव्हती. संबंधित कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडण्याबाबत माझी परवानगी घेतली नाही.
- दयाराम राठोड, गटविकास अधिकारी, मौदा
-
कार्यक्रम असल्याने मी दुपारी १२ वाजतानंतर रामटेकला गेलो होतो. याबाबत बीडीओंना सूचना दिली होती.
- रवींद्र निशाने, ग्रामसेवक, खंडाळा.
शासनाने ५ दिवसांचा आठवडा करूनही कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीत कसलाही बदल झालेला दिसून येत नाही. कार्यालयीन वेळेत जनतेचे कामे सोडून पार्टी करणे बेकायदेशीर आहे.
- संकेत झाडे, उपसरपंच खंडाळा.
मौदा पंचायत समितीत कार्यरत कर्मचारीवर्ग जनतेच्या कामकाजाविषयी गंभीर दिसून येत नाही. शासन निर्णयानुसार ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा आंदोलन पुकारले जाईल.
- रोशन मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य, नेरला.