नागपूर : दुकान रिकामे करण्याच्या वादातून रंगूनवाला बंधूंनी १४ लाखांची लूट करून ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या घटनेत रिव्हॉल्व्हरचाही वापर केल्याची बाब समोर आली आहे. या ताज्या प्रकरणासोबत रंगूनवाला बंधूंचे आणखी काही कारमानेदेखील समोर आले आहेत.
याप्रकरणी गुन्हे शाखेने हारीस रंगूनवाला आणि त्याचा भाऊ झैन रंगूनवाला यांना अटक केली आहे. बोरगाव येथील रहिवासी अर्शद डल्ला हा तुषाद जाल याच्यासोबत सदर येथे रेस्टॉरंट चालवत असे. ते रिकामे करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपींनी मध्यस्थी करण्याचे आश्वासन दिले होते. डल्लाचे दुकान रिकामे केल्याच्या बदल्यात १४ लाख रुपये रोख आणि एक लाख रुपयांचा धनादेश मिळाला. ही रक्कम व धनादेश घेण्यासाठी डल्ला धंतोली येथे आला. तेथे झैन हा डल्ला यांच्याकडील पैशांची बॅग घेऊन फरार झाला होता. नंतर हारीसने डल्लाला आपल्या घरी बोलावून १४ लाखांपैकी ४ लाख आपल्या वाट्याचे म्हणून ठेवले. डल्लाला १० लाख सांगून बॅगेत ६ लाख रुपये दिले. शिवाय १० लाख रुपये मिळाल्याचे लिहूनही घेतले. डल्लाने ४ लाख रुपये मागितले असता, त्याने गोळ्या घालण्याची धमकी दिली आणि खंडणी म्हणून पाच लाख रुपये देण्यास सांगितले. सदर पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे डल्ला यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर गुन्हे शाखेने रंगूनवाला बंधूंना अटक केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणामध्ये कुख्यात गुन्हेगार मोहसीनचाही सहभाग आहे. मोहसीनवर हत्या आणि गोळीबारासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीएची कारवाईही करण्यात आली आहे. दीड वर्षांपूर्वी गीतांजली टॉकीज चौकात झालेल्या गोळीबारात मोहसीन थोडक्यात बचावला होता. यानंतर तो भूमिगत होऊन आरोपींसोबत जमीन बळकावणे व इतर गुन्हे करतो. आरोपींनी डल्लाला गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. आरोपी नेहमी रिव्हॉल्व्हर ठेवतात, असे सांगितले जाते.