नागपूर : देवीच्या रूपात स्त्रियांप्रमाणे किन्नर किंवा तृतीयपंथीयांनाही महत्त्वाचे स्थान आहे. हे महत्त्व लक्षात घेत लक्ष्मीनगरस्थिती राणी दुर्गा उत्सव मंडळाने विशेष पाऊल टाकत तृतीयपंथीयांना आरतीचा मान दिला. गुरुवारी तृतीयपंथी व्यक्तींनी दुर्गामातेची आरती केली.
माेहिनी, साेनू, सनी, हनी, वर्षा आदींनी मनाेभावे मातेची आरती केली. मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न माेहिले यांनी त्यांचे स्वागत करून ओटी भरली आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे सचिव आनंद कजगीकर, काेषाध्यक्ष अमाेल अनविकर यांनी भेटवस्तू दिल्या. यावेळी कल्याणी देशपांडे, समृद्धी पुनतांबेकर, प्राजक्ता सोमकुवर, अनू देशपांडे, कार्तिक बांडे, नितीन येते आदी उपस्थित होते.
राणीलक्ष्मी दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने या वर्षी स्वप्नलाेकीचा देखावा साकार केला आहे. पश्चिम बंगालचे निहार देबनाथ यांच्या संकल्पनेतून हा देखावा तयार करण्यात आला आहे. आकर्षक अशा स्वप्नलाेकीच्या महालात दुर्गामाता विराजमान असल्याचा हा देखावा भाविकांच्या व पर्यटकांच्याही आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्यामुळे शेकडाे लाेक दरराेज या मंडळाला भेटी देत आहेत. देवीच्या दर्शनासह हा देखावा बघण्याचा अनाेखा आनंद मिळत आहे. दरम्यान, लाेकमत सखी मंचच्या सदस्यांना ‘प्रथम या, प्रथम प्रवेश मिळवा’ या तत्त्वावर ओळखपत्राद्वारे प्रवेश दिला जात आहे. सखींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.