रणजित पाटील यांनी स्वत:वरील आरोप फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:07 AM2018-06-16T00:07:59+5:302018-06-16T00:08:12+5:30
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, यासंदर्भातील याचिका तांत्रिक मुद्यांच्या आधारावर उच्च न्यायालयात दाखल केल्या जाऊ शकत नसल्याचा दावा करून याचिका खारीज करण्याची विनंती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, यासंदर्भातील याचिका तांत्रिक मुद्यांच्या आधारावर उच्च न्यायालयात दाखल केल्या जाऊ शकत नसल्याचा दावा करून याचिका खारीज करण्याची विनंती केली.
प्रशांत काटे व संतोष गावंडे या दोघांनी पाटील यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकांवर शुक्रवारी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने पाटील यांच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केले व पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी प्रकरणावर चार आठवड्यांनंतर सुनावणी निश्चित केली. पाटील विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघातून निवडून आले आहेत. ही निवडणूक ३ फेबु्रवारी २०१७ रोजी झाली व ६ फेबु्रवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पाटील यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली. त्यासंदर्भात तक्रार केल्यानंतरही त्यांचे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले. त्यामुळे विविध कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन झाले असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. पाटील यांनी याचिकाकर्त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. याचिकाकर्त्यांचे आरोप सिद्ध होत नाहीत. त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत असे पाटील यांनी न्यायालयाला सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. शैलेश नारनवरे तर, पाटील यांच्यातर्फे अॅड. अक्षय नाईक यांनी बाजू मांडली.