लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ‘रणजी ट्रॉफी जितेगा कौन, फैज फझल..., फैज फझल... आणि जितेगा भाई जितेगा विदर्भ जितेगा अशा घोषणांसह पुंगी वाजवून तसेच शंखनाद करीत व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर चाहत्यांनी विदर्भ संघाला भक्कम पाठिंबा देत विजयासाठी त्यांच्यात जोश भरला. सौराष्ट्रविरुद्ध रविवारी सुरू झालेल्या या फायनलकडे चार दिवस पाठ फिरविणाऱ्या चाहत्यांनी अखेरच्या दिवशी गुरुवारी चांगली गर्दी केली होती. पश्चिम स्टॅन्डमध्ये खेळाडूंना पाठिंबा दर्शविणाºया अनेक चाहत्यांच्या हातात कापडी फलक आणि तिरंगा होता. दक्षिणेकडील स्टॅन्डमध्ये विदर्भ संघाच्या खेळाडूंचे कुटुंबीय आणि काही क्लब्स्चे पदाधिकारी आणि उदयमान क्रिकेटपटू होते. बच्चे कंपनीचा उत्साह ओसंडून वाहात होता. सरवटे आणि वखरे यांच्या प्रत्येक चेंडूवर प्रेक्षकांकडून टाळ्या पडल्या. दोघांनी गडी बाद करताच काहींनी नृत्यही केले. यादरम्यान फैजच्या चाहत्यांनी त्याच्या कामगिरीचा आलेख असलेले फलक हातात घेतले होते. शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात विदर्भाचा विजय साकार होईपर्यंत चाहत्यांचा हा जल्लोष कायम राहिला. सौराष्ट्रचा अखेरचा फलंदाज बाद होताच विदर्भाच्या खेळाडूंनी एकमेकांना आलिंगन देत विजयाचा आनंद साजरा केला. काहींनी स्टम्प हातात घेत नातेवाईकांच्या दिशेने उंचावला. कोच चंद्रकांत पंडित आणि सहायक स्टाफने देखील खेळपट्टीकडे धाव घेतली. सर्वांनी एकमेकांना मिठी मारल्यानंतर खेळाडू गोलाकार फिरून नाचले. यावेळीही चाहत्यांनी बाहेरून जोरदार टाळ्या वाजवून तसेच एकमेकांचे अभिनंदन करीत विजय साजरा केला. पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी देखील हा जल्लोष कायम होता. खेळाडूंनी यानंतर मैदानाला फेरी मारून चाहत्यांचे पाठिंब्यासाठी आभार मानले. काहींनी चाहत्यांसोबत सेल्फी काढून घेतला. पुरस्कार सोहळा संपल्यानंतर विदर्भ संघाने व्हीसीएच्या ग्राऊंड स्टाफसह फोटो काढून घेत त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
रणजी ट्रॉफी : जय विदर्भ...‘हाऊ इज द जोश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 11:22 AM
‘रणजी ट्रॉफी जितेगा कौन, फैज फझल..., फैज फझल... आणि जितेगा भाई जितेगा विदर्भ जितेगा अशा घोषणांसह पुंगी वाजवून तसेच शंखनाद करीत व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर चाहत्यांनी विदर्भ संघाला भक्कम पाठिंबा देत विजयासाठी त्यांच्यात जोश भरला.
ठळक मुद्देचाहत्यांच्या उत्साहाने खेळाडूंमध्ये भरला जोश जितेगा कौन, फैज फझल, फैज फझल!