नागपूर :काँग्रेस नेते रणजित देशमुख यांच्यात मोठी क्षमता होती. त्यांनी काँग्रेस पक्ष, कार्यकर्त्यांसाठी संघर्ष केला. प्रत्येकवेळी ते सीए पदाचे ‘मटेरियल’ आहेत म्हणून चर्चा व्हायची. मात्र,, मध्येच काही घडामोडी घडल्या, त्यांना ती संधी मिळाली नाही. पक्षाला, विदर्भाला न्याय देणाऱ्या या नेत्याला हवा असलेला न्याय दुर्दैवाने मिळू शकला नाही, अशी खंत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
काँग्रेस नेते रणजित देशमुख यांचा अमृत महोत्सवी सत्कार व पत्नी रुपाताई देशमुख यांचा सत्कार शनिवारी सुरेश भट सभागृहात करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, खा. शत्रुघ्न सिन्हा, अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव आशुिष दुआ, खा. कृपाल तुमाने, माजी खा. विलास मुत्तेमवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वंसत पुरके, विनोद गुडधे पाटील, रमेश बंग, माजी खा. मारोतराव कोवासे, राजेंद्र मुळक, माजी आ. आशुिष देशमुख, डॉ. अमोल देशमुख यांच्यासह विदर्भातील काँग्रेस नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, रणजितबाबू पहिल्या टर्ममध्ये आमदार झाले तेव्हापासून त्यांचे आकर्षण होते. मंत्री असताना त्यांनी सर्वांना मदत केली. २००४ च्या निवडणुकीत काही वेगळे घडले नसते तर महाराष्ट्रासाठी चांगले झाले असते. पुढे त्यांच्या प्रकृतीने साथ दिली असती तर महाराष्ट्राचे राजकारण बदलण्याची ताकद त्यांच्यात होती, असेही त्यांनी सांगितले. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, आपले देशमुख कुटुंबीयांशी वैयक्तिक संबंध आहेत. एवढी वर्षे पक्ष, राज्य व जनतेची सेवा करणाऱ्या नेत्याच्या अमृत महोत्सवाला येण्याचे भाग्य लाभले. उपस्थित जनसमुदाय हीच रणजितबाबूंच्या कामाची पावती असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक राजेंद्र शर्मा यांनी केले. विजय धोटे यांनी मानपत्र वाचन केले.
- अ.भा. काँग्रेसचे सचिव आशिष दुआ यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला.
- डॉ. आयुषी आशुिष देशमुख यांनी पुढाकार घेऊन तयार केलेल्या ‘रण-जीत’ या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन करण्यात आले.
- डॉ. रणजित देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.