लोकमत न्यूज नेटवर्कनाागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी आपला धाकटा मुलगा डॉ. अमोल यांच्या विरोधात मानसिक छळवणुकीची तक्रार सीताबर्डी पोलिसात केली आहे. सिव्हिल लाईन्स येथील आपल्या घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अमोल यांनी अवैधरित्या कब्जा केला आहे. वारंवार सांगूनही तो घर रिकामे करण्यास तयार नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार रणजितबाबू यांनी दाखल केली आहे. देशमुख पिता-पुत्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. मात्र, रणजितबाबू यांनी केलेल्या पोलीस तक्रारीमुळे आता त्यांच्यातील वाद आता थेट चव्हाट्यावर आला आहे. रणजित देशमुख यांचे आमदार डॉ. आशिष देशमुख व डॉ. अमोल देशमुख हे दोन पुत्र आहेत. डॉ. आशिष हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘बरकत’ या बंगल्यात स्वतंत्र राहतात. तर डॉ. अमोल यांचे नागपुरात दुसरीकडेही घर आहे. मात्र, ते गेल्या काही वर्षांपासून त्यांचे जीपीओ चौकातील रणजितबाबू यांच्या घरातही वास्तव्य होते. देशमुख देशमुख हे सध्या वयाच्या सत्तरीत असून पार्किन्सन आजाराने ग्रस्त आहेत. वयाच्या उत्तरार्धात त्यांनी आपल्या धाकट्या मुलाविरोधात घर खाली करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. गेल्या दीड महिन्यापासून रणजीतबाबू हे पुत्र आमदार आशिष देशमुख यांच्याकडे वास्तव्यास आहेत. आशिष हेच त्यांची काळजी घेत आहेत. सीताबर्डी पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. आपल्या मुलाने घराचे कुलुप तोडून कथित भागावर कब्जा केल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. त्याने या भागावर कब्जा करू नये यासाठी खासगी सुरक्षारक्षक देखील तैनात केल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. या प्रकरणी देशमुख यांची तक्रार प्राप्त झाल्याचे सीताबर्डी पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत खराबे यांनी सांगितले. हा घरगुती वाद असून पोलीस नियमाप्रमाणे कारवाई करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.घरात मुलांचा हस्तक्षेप नको : रणजित देशमुख मला माझ्या घरात मुलांचा हस्तक्षेप नको आहे. सिव्हिल लाईन्स येथील घर रिकामे करण्यासाठी मी गेल्या दोन वर्षांपासून त्याला सांगत आहे. मात्र, त्याने ऐकले नाही. त्याच्या वास्तव्यामुळे माझी प्रायव्हसी भंग होत आहे. मला मोकळेपणा वाटत नाही. अमोलला मी नागपुरात दोन घरे घेऊन दिली आहेत. त्याने तेथे आपला संसार थाटावा. मात्र, तो तसे न करता माझ्या घराचा ताबा सोडण्यास तयार नाही. मी वारंवार विनंती करूनही त्याच्यावर काहीच परिणाम झालेला नाही. उलट तो अधिक आक्रमक होऊ लागला आहे. त्यामुळे मला नाईलाजास्तव माझे घर त्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी पोलिसात धाव घ्यावी लागली आहे असे रणजित देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.