दयानंद पाईकराव, नागपूर : मुस्लीम फुटबॉल क्लब के पद पर रहना है तो मुझे १० हजार महिना देना पडेंगा, नही तो तुमको जान से मार दुंगा अशी धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला तहसिल पोलिसांनी अटक केली आहे.
अरबाज उर्फ सानू मांजा (३५, रा. कमालबाबा दरगाह मागे, मोमिनपुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी मोहम्मद कामील मोहम्मद हसन अंसारी (७३, रा. भानखेडा, मोमिनपुरा) हे यंग मुस्लीम फुटबॉल क्लब मोमिनपुराचे अध्यक्ष व मोमिनपुरा कब्रस्तानचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते शुक्रवारी १ मार्चला रात्री ११ वाजता मोमिनपुरा फुटबॉल ग्राऊंडवर आपल्या कार्यालयात सुरक्षा रक्षक व इंजिनियर सोबत बसले होते. तेवढ्यात आरोपी अरबाज तेथे आला. त्याने ‘अगर आपको मुस्लीम फुटबाॅल क्लब संस्था के पद पर रहना है तो तूमको मुझे १० हजार रुपये महिना देना पडेंगा, नही तो तुमकाे जानसे मार दुंगा’ अशी धमकी दिली.
‘तुमने मुझे पहले भी अंदर कराया था, मै उसका बदला लुंगा’ असे म्हणून त्याने अंसारी यांना शिविगाळ केली. आजु-बाजुचे लोक जमा झाल्याने आरोपी तेथून पळुन गेला. याप्रकरणी अंसारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसिल पोलिसांनी आरोपी अरबाजविरुद्ध कलम ३८५, ३८७, २९४, ५०६ (ब) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.