लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिटी सर्व्हे विभागाच्या भूमापन अधिकारी डॉ. सारिका कडू यांना ब्लॅकमेल करून तीन लाख रुपयाची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. कडू यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखा पोलिसांनी एक औषध व्यापाऱ्यासह दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाच मूख्य सूत्रधार फरार आहे. या घटनेमुळे शासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कृष्णा सुरेश इंगोले (२२) रा. भरतवाडा कळमना, आणि जय सुरेश आग्रेकर (४०) रा. सेंट्रल एव्हेन्यू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे तर संदीप वसंत देशपांडे रा. झेंडा चौक महाल असे मुख्य सूत्रधाराचे नाव असून तो फरार आहे.संदीप हा नेत्यांशी जुळलेला आहे. ब्लॅकमेलिंगची सुरुवात एप्रिल महिन्यात झाली. संदीपने डॉ. कडू यांना फोन केला. त्याने स्वत:ला मनसेच्या मुंबई शाखेचा मोठा पदाधिकारी असल्याचे सांगितले. त्याने डॉ. कडू यांना सिटी सर्व्हेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याचे सांगत त्याच्याकडे याची एक ‘क्लीपिंग’ असल्याचा दावा केला. त्याने ही ‘क्लीपिंग’ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि मीडियामध्ये देण्याची धमकी देत डॉ. कडू यांच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्याच्या मोबाईल नंबरची चौकशी केली असता तो संदीप देशपांडे याचा असल्याचे लक्षात आले. संदीपने तीन लाख रुपये न दिल्यास बदनाम करण्याची धमकी दिली.संदीपचा नेमका कोण आहे हे माहीत करून घेण्यासाठी डॉ. कडू या संदीपच्या प्रत्येक फोनवर त्याला प्रतिसाद देऊ लागल्या. संदीप सुरुवातीला व्हॉट्सअॅप कॉल करीत होता. ती पहिली किस्त म्हणून ७० हजार रुपये द्यायला तयार झाली. संदीपच्या सांगण्यानुसार डॉ. कडू २ मे रोजी रात्री ८.३० वाजता रविनगर चौकात पोहाचल्या. संदीपने तिथे कृष्णाला पाठवले. कृष्णा अॅक्टिव्हाने तिथे आला. तो डॉ. कडू यांच्याकडून पैसे घेऊन निघून गेला. यानंतर संदीप डॉ. कडू यांना उर्वरित २.७० लाख रुपयााठी सातत्याने फोन करून धमकावू लागला. दरम्यान डॉ. कडू यांना संदीपचा मुंबईतील मनसे नेत्यांशी कुठलाही संबंध नाही. तो विनाकारण त्यांना ब्लॅकमेल करीत असल्याचेही लक्षात आले. त्रास देण्यासारखा किंवा बदनाम करण्यासारखी कुठलीही क्लीपिंग त्याच्याकडे नसल्याचेही त्यांना समजले.त्यामुळे डॉ. कडू यांनी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली. त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. डॉ. उपाध्याय यांनी गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे निर्देश दिले.गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी संदीपच्या मोबाईल नंबरची तपासणी केली. त्यातून कृष्णा व जय त्याच्याशी जुळले असल्याचे लक्षात आले. या आधारावर पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडण्याची योजना आखली. त्यांनी डॉ. कडू यांच्या माध्यमातून देशपांडे यांना सोमवारी दुपारी २.३० वाजता पैसे घेण्यासाठी रविनगर चौकात बोलावले. डॉ. कडू यांना एक बॅग दिली. त्यात दोन हजार रुपयाचे तीन नोट होते. त्या नोटांमध्ये कागदाचे बंडल ठेवले होते. संदीपने पैसे घेण्यासाठी कृष्णाला पाठवले. दुपारी ४.४५ वाजता कृष्णा अॅक्टीव्हाने तिथे आला. त्याने डॉ. कडू यांच्याकडून पैसे घेताच जवळच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडले.त्याने संदीप मुंबईला असल्याचे सांगितले. कृष्णाने जय आगे्रकरकडे पैसे सोपवणार असल्याची माहिती दिली. यापूर्वी मिळालेले ७० हजार रुपये सुद्धा जयकडेच दिल्याचे त्याने सांगितले. यानंतर पोलिसांनी जयला सुद्धा ताब्यात घेतले. त्याने यााबतची माहिती नसल्याचे सांगितले. जयचे म्हणणे आहे की, संदीपसोबत त्याची जुनी ओळख आहे. त्याने त्याचा डेअरीचा व्यवसाय असल्याचे सांगितले होते. डेअरीचे पैसे असल्याचे सांगून ते त्याच्याकडे ठेवले होते. जयचा भाऊ लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकर याचे दोन वर्षापूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. जय चांगल्या परिवाराशी जुळलेला आहे. तो या खंडणी वसुलीत अडकल्याने सर्वच आश्चर्यचकित आहेत.आरोपीविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अंबाझरी पोलिसांनी १६ मे पर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. ही कारवाई निरीक्षक अनिल ताकसांडे, एपीआय जितेंद्र बोबडे, पीएसआय राजकुमार त्रिपाठी, एएसआय मोहन साहू, सीताराम पांडेय, पोलीस कर्मचारी रवींद्र गावंडे, संतोष निखारे, प्रशांत देशमुख, बलजीत सिंह, संतोष मदनकर, प्रकाश वानखेडे, योगेश गुप्ता, निनाजी तायडे, सागर ठकरे आणि विजय लेकुरवाळे यांनी केली.