कथित पत्रकारांविरुद्ध गुन्हानागपूर : बदनामीचा धाक दाखवून डॉक्टरकडून तीन लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या कथित पत्रकारांविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रितेश बोरकर, तुषार गागरे आणि अन्य एक साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे एका स्थानिक वृत्तवाहिनीत काम करतात, असे समजते. डॉ. मुरलीबाल सुंदर कांतियामाल (वय ४७) असे तक्रारकर्त्या डॉक्टरचे नाव आहे.मार्च महिन्यात डॉ. मुरलीबाल यांच्या होप हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण दाखल होता. त्याच्या पायाला गंभीर दुखापत होती. ती चिघळतच गेली. राजीव गांधी योजनेंतर्गत उपचार करतो, अशी बतावणी होऊनही त्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाने पैसे घेतल्याचा आरोप होता. त्यासाठी २० मार्चला दुपारी ३ वाजता आरोपी रितेश बोरकर, तुषार गागरे आणि त्याचा एक साथीदार डॉ. मुरलीबाल यांच्याकडे पोहचला. ‘आम्ही पत्रकार आहोत. तुम्ही केलेले कृत्य आम्ही न्यूजपेपर आणि टीव्हीत प्रसारित करू’, अशी धमकी आरोपींनी डॉक्टरला दिली. बदनामी टाळण्यासाठी डॉक्टरने त्यांना काय हवे,अशी विचारणा केली असता आरोपींनी तीन लाखांची खंडणी मागितली. डॉक्टरने ती मान्य करीत ५ एप्रिल ते २४ मे या कालावधीत २ लाख ८३ हजार ९०० रुपये खंडणी दिली. त्यानंतरही अवघ्या १६ हजारांसाठी आरोपींचा त्रास सुरूच असल्याने डॉक्टरने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी रितेश, तुषार आणि अन्य एका साथीदारावर गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)कशाला दिली खंडणी? पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, डॉ. मुरलीबाल यांनी आरोपीला २ लाख ८३ हजार ९०० रुपयांची खंडणी दिली. डॉक्टरची चुकी नव्हती तर डॉक्टरने आरोपींना खंडणी कशासाठी दिली, हा प्रश्न चर्चेला आला आहे. दुसरे म्हणजे, तक्रार देण्यासाठी डॉक्टरने एवढा वेळ का लावला, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणातील तो तिसरा आरोपी कोण आहे, त्याबाबतही उलटसुलट चर्चा आहे. या प्रकरणाची दुसरी बाजू अंधारात असल्याचे सांगितले जाते.
बदनामीचा धाक दाखवून खंडणी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2016 2:48 AM