अपहरण आणि खंडणी वसुली प्रकरण : गुन्हेशाखा पोलिसांची कारवाई नागपूर : क्रिकेट बुकी अजय राऊत अपहरण आणि खंडणी वसुली प्रकरणात आरोपींनी उकळलेल्या पावणेदोन कोटी रुपयांच्या खंडणीपैकी १ कोटी ४२ लाख, ५० हजारांची रोकड गुन्हेशाखेच्या पोलिसांनी जप्त केली. गुन्हेशाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा तसेच सहायक आयुक्त नीलेश राऊत यांनी शनिवारी पत्रकारांना ही माहिती दिली. उर्वरित ३२ लाख, ५० हजार रुपये आणि फरार आरोपींनाही आम्ही लवकरच ताब्यात घेऊ, असा विश्वास यावेळी शर्मा यांनी व्यक्त केला. उपराजधानीतील गुन्हेगारांच्या प्रमुख टोळ्यांचा सरदार आणि पहिल्या तीन टोळी प्रमुखांपैकी एक असलेला राजू भद्रे हा या अपहरण आणि खंडणी वसुली प्रकरणाचा मास्टर मार्इंड आहे. त्याच्याच सांगण्यावरून भद्र्रेचा राईट हॅण्ड दिवाकर कोतुलवार याने आपल्या टोळीतील गुंडांच्या मदतीने ११ डिसेंबर २०१५ ला दुपारी अजय राऊतचे अपहरण केले. त्याला बेदम मारहाण करून त्याच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देत आरोपींनी त्याच्याकडून १ कोटी ७५ लाखांची खंडणी वसुल केली. नागपुरातील आतापर्यंतची सर्वात मोठी खंडणी ठरलेल्या या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी राऊत जीवाच्या भीतीने टाळाटाळ करीत होता. मात्र, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, एसीपी निलेश राऊत आणि त्यांच्या साथीदारांनी अत्यंत शिताफीने या प्रकरणाची फोड करीत सूत्रधार राजू भद्रे याला १५ फेब्रुवारीला अटक केली. त्याचा पीसीआर मिळवल्यानंतर १७ फेब्रुवारीला त्याच्या भांडे प्लॉटमधील निवासस्थानी पोलिसांनी झडती घेऊन ५० लाख रुपये जप्त केले. खंडणीची रक्कम दिवाकर घेऊन पळाल्याचे सांगणाऱ्या भद्रेला पोलिसांनी पुन्हा एकदा बोलते केले आणि शुक्रवारी त्याच्या निवासस्थानी पुन्हा धडक दिली. भाडेकरू राहाणाऱ्या जवळच्या एका खोलीतून पोलिसांनी यावेळी पुन्हा ४९ लाख, ९६ हजारांची रोकड जप्त केली. दरम्यान, भद्रेला अटक करताच त्याचा राईट हॅण्ड दिवाकर कोतुलवारही न्यायालयात शरण आला. त्याची झाडाझडती घेतल्यानंतर आज पोलिसांनी ४० लाख रुपये जप्त केले. यापूर्वी या गुन्ह्यातील एक आरोपी मंगेश शेंडे याच्याकडून पोलिसांनी कार आणि २ लाख, ५४ हजारांची रोकड जप्त केली होती. अशा प्रकारे या गुन्ह्यातील पावणेदोन कोटींपैकी एक कोटी, ४२ लाख ५० हजार रुपये पोलिसांनी आतापर्यंत जप्त केले. अर्थात् एक कोटी रुपये भद्रेकडून, ४० लाख दिवाकरकडून आणि अडीच लाख रुपये शेंडेकडून जप्त झाले आहे. त्यातील ५० लाख रुपये सरकारच्या खात्यात बँकेत जमा करण्यात आल्याचेही शर्मा यांनी सांगितले. पोलिसांनी भद्रेच्या नावावर असलेल दत्तात्रय नगरातील एकूण ४ हजार चौरस फुटाचे दोन भूखंड (अंदाजे किंमत १ कोटी ६० लाख), आलिशान फोक्स वॅगन कार (अंदाजे १५ लाखांची), अन्य एक कार जप्त केली. गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओसुद्धा लवकरच ताब्यात घेतली जाणार आहे.(प्रतिनिधी)एक कोटीचा गेम प्लान गुन्ह्यात भद्र्रेचा संबंध दिसू नये म्हणून त्यांनी एक नवीन चाल खेळली. राऊतचे अपहरण केल्यानंतर कोतुलवार आणि गुंडांनी त्याला जोरदार मारहाण करून मित्रांना पाच कोटी रुपये मागण्यास सांगितले. जीवाच्या धाकाने राऊतने दीपक मुणोतला फोन करून ५० लाख तर हिराचंदानीकडून २५ लाख रुपये जमविले. त्यानंतर एक कोटी रुपये उधार घेण्यासाठी भद्रेला फोन केला. भद्रेने स्पष्ट नकार दिला. थोड्या वेळेनंतर भद्रेच्या साथीदारांनी त्याला फोन करून ‘तू फक्त एक कोटी देतो’,असे म्हणायला लावले. त्यानंतर राऊतला भद्रेकडे पुन्हा रक्कम मागायला लावली. यावेळी भद्रेने कोणतेही आढेवेढे न घेता एक कोटी रुपये खंडणी घ्यायला आलेल्याकडे दिल्याचे सांगितले. राऊतने दुसऱ्या दिवशी दागिने गहाण ठेवून ५० लाख तर पुन्हा दोन दिवसानंतर ५० लाख भद्रेच्या घरी पोचवले.भद्रेचा गुरुमंत्रतक्रार दाखल केल्यानंतर राऊतने आरोपी कोण, हे सांगितले नव्हते. पोलिसांनी एकेक धागा जोडत आरोपींच्या मुसक्या बांधल्या. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे कोतुलवारला चौकशीसाठी गुन्हे शाखेत बोलवले होते. एक, दोन नव्हे तर तीनवेळा कोतुलवार गुन्हे शाखेत पोलिसांसमोर आला आणि त्याने बेदरकारपणे चौकशीचा सामना केला. त्यावेळी त्याने या प्रकरणाची आपल्याला कसलीही माहिती नसल्याचे सांगून सपशेल कानावर हात ठेवले होते, नंतर मात्र तो फरार झाला.पोलिसांना त्याने तब्बल दोन महिने गुंगारा दिला. मात्र, भद्रेच्या पोलिसांनी मुसक्या बांधताच कोतुलवार न्यायालयात शरण आला. भद्र्रेच्या सांगण्यावरूनच कोतुलवारने शरणागती पत्करल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांनी त्याचा इन्कार केला. ‘बॉस’ला अटक झाल्यामुळे जास्त लचांड मागे लागणार नाही, अशी खात्री असल्यामुळे त्याने शरणागती पत्करल्याचे शर्मा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पुरी पिक्चर जल्द ही खतम...!कुख्यात कोतुलवार फरारीच्या कार्यकाळात छिंदवाडा, पचमढी, रायपूर, छत्तीसगडमधील विविध शहरात फिरत होता. तर त्याचा भाऊ आशिष कोतुलवार, जल्लाद ऊर्फ खुशाल थूल आणि नितीन पाटील हे आरोपी फरार आहेत, ते खंडणीची रक्कम घेतल्यानंतर ३१ डिसेंबरला गोव्यात मौजमजेसाठी गेले होते, असेही शर्मा यांनी सांगितले. त्यांना आम्ही लवकरच अटक करू, असा विश्वास शर्मा आणि राऊत यांनी व्यक्त केला. पुरी पिक्चर जल्द ही खतम होगी, असेही ते म्हणाले.संतोष आंबेकरचा ठिकठिकाणी शोधमोक्काचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला कुख्यात संतोष आंबेकर याला आम्ही लवकरच अटक करू, असे शर्मा एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके ठिकठिकाणी जात आहे. मुंबईतही पाच दिवस एक चमू आंबेकरचा शोध घेत फिरली. तो जास्त दिवस पोलिसांना गुंगारा देऊ शकत नाही, असे शर्मा म्हणाले.
खंडणीचे १ कोटी, ४२ लाख जप्त
By admin | Published: February 21, 2016 2:41 AM