लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्व वर्तमानपत्रात बदनामीकारक वृत्त प्रकाशित करण्याचा धाक दाखवून नागपुरातील राजघराण्याशी संबंधित व्यक्तीला दोन लाखाची खंडणी मागणारा आरोपी त्रिशरण शंकरराव सहारे (वय ५०, रा. सदोदय पॅलेस, गड्डीगोदाम) याने त्याला अटक करण्यापूर्वी एका हॉटेलमध्ये पार्टी दिली होती, असे वृत्त चर्चेला आले आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास आता गुन्हे शाखा पोलीस करीत असून त्यांनी गुरुवारी सहारेला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी चार दिवसांनी वाढवून घेतली.
भोसले राजघराण्याशी संबंधित असलेले विश्वजित किरदत्त हे या प्रकरणात तक्रारदार आहेत. राजघराण्याशी संबंधित एका जमिनीचा राकेश गुप्ता, ॲड. प्रकाश जयस्वाल आणि दुनेश्वर पेठे यांच्या नावे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा सौदा केला होता. या सौद्यापोटी विश्वजित आणि त्यांच्याशी (राजघराण्यातील) संबंधित व्यक्तींच्या खात्यात लाखोंची रक्कम जमा झाली. ही रक्कम गँगस्टर रणजित सफेलकर याच्या बँक खात्यातून वळती झाली होती. ते कळाल्यानंतर आरोपी त्रिशरण सहारेने विश्वजित यांना फोन करून खंडणीसाठी त्रास देणे सुरू केले. गँगस्टर सफेलकरसोबत तुमचे आर्थिक संबंध असून फोटोसुद्धा आहेत. तुमच्याविरुद्ध सर्व वर्तमानपत्रात बदनामीकारक वृत्त छापून प्रेस रिपोर्टर तुमची बदनामी करतील. ते टाळण्यासाठी तुम्हाला दोन लाखांची खंडणी द्यावी लागेल, असे सहारे याने म्हटले होते. गँगस्टर सफेलकरसोबत संबंध नसतानादेखील सहारे ब्लॅकमेल करत असल्याने विश्वजित यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून सापळा रचून गुन्हे शाखेच्या पथकाने सहारेच्या मुसक्या बांधल्या. त्याला
न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. चाैकशीत सहारेने या खंडणीसाठी केलेले प्लॅनिंग आणि हॉटेलमध्ये दिलेल्या पार्टीची माहिती उघड केली. दरम्यान, हा तपास तहसील पोलिसांकडून गुन्हे शाखेला सोपविण्यात आला. त्यानुसार, सहारेला गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायालयात हजर करून त्याच्या ब्लॅकमेलिंगचे किस्से पुराव्याच्या रुपात ठेवले. ते लक्षात घेत न्यायालयाने त्याला चार दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड वाढवून दिला.
धक्कादायक खुलासे अपेक्षित
सहारेची पोलीस कोठडी वाढवून मिळाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होण्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर आणखी काही जणांची चाैकशीही होण्याचे संकेत आहेत.