नागपुरातील ‘त्या’ नराधम बापाची शिक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:08 PM2018-07-24T23:08:08+5:302018-07-24T23:10:59+5:30
स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दणका दिला. आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दणका दिला. आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हा निर्णय दिला.
ही घटना यशोधरानगर पोलिसांच्या हद्दीतील आहे. आरोपीने मार्च-२०१४ पासून मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. आजारी पडल्यानंतर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता, बापाच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना उघडकीस आली. २८ आॅगस्ट २०१४ रोजी आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यावेळी मुलीच्या पोटात पाच महिन्याचा गर्भ होता. तिने मुलीला जन्म दिल्यानंतर डीएनए चाचणी करण्यात आली. त्यावरून आरोपीचे कुकर्म सिद्ध झाले.
विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. १२ जुलै रोजी अपीलवर अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. तो निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला. उच्च न्यायालयात सरकारतर्फे अॅड. स्वाती कोल्हे यांनी बाजू मांडली.