लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रियकराने लग्नाचे खोटे वचन देऊन सात वर्षे वारंवार बलात्कार केल्याची एका पोलीस महिलेची तक्रार निराधार आढळून आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा पोलीस ठाण्यात दाखल संबंधित एफआयआर अवैध ठरवून रद्द केला. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
प्रियकराचे नाव नीतेश भारद्वाज असून त्याने संबंधित एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तक्रारकर्ती महिला विवाहित आहे. असे असताना भारद्वाज तिच्यासोबत लग्न करण्यास तयार झाला. त्या आधारावर त्याने तक्रारकर्त्या महिलेवर सात वर्षे वारंवार बलात्कार केला. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला, अशी पोलीस तक्रार होती. उच्च न्यायालयाने गेल्या ११ फेब्रुवारी रोजी प्राथमिक बाबी लक्षात घेता भारद्वाजविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास अंतरिम मनाई केली होती. अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाला, भारद्वाजने नात्याच्या सुरुवातीपासूनच लग्नाचे खोटे वचन दिले होते असा तक्रारकर्त्या महिलेचा आरोप नसल्याचे दिसून आले. तसेच, एकूणच तथ्ये लक्षात घेता बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊ शकत नसल्याचे आढळले. परिणामी, विवादित एफआयआर रद्द करण्यात आला. भारद्वाजतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले.