लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात, असा समज आहे. मात्र मागील वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षभरात १०१ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा ५३ टक्क्यांनी अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे विविध गुन्ह्यांसंदर्भात विचारणा केली होती. नागपूर ग्रामीणमध्ये २०१७ मध्ये दरोडा, बलात्कार, चोरी, खून, विनयभंग इत्यादींचे किती गुन्हे दाखल झाले व किती आत्महत्या झाल्या, यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत ग्रामीण भागात महिलांवर झालेल्या अत्याचाराचे ५५६ गुन्हे नोंदविण्यात आले. यात बलात्काराच्या १०१ प्रकरणांची नोंद आहे. २०१६ मध्ये हाच आकडा ६६ इतका होता. याशिवाय २०१७ या वर्षभरात विनयभंगाचे २१२ तर अपहरणाचे १४९ गुन्हे दाखल झाले.वर्षभरात ४१ हत्याया कालावधीत ग्रामीण भागात ४१ हत्या झाल्या. जबरी चोरीच्या ६२ प्रकरणांची नोंद झाली तर ८ ठिकाणी दरोडे पडले. दंगा पसरविण्यासाठी ८९ गुन्हे दाखल झाले.दिवसाला एक आत्महत्याजिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात थोड्याथोडक्या नव्हे तर ३४९ नागरिकांनी विविध कारणांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. सरासरी प्रत्येक महिन्याला २९ आत्महत्यांची नोंद झाली. ग्रामीण भागात आत्महत्यांचे प्रमाण कमी असते, असा समज आहे. मात्र ही आकडेवारी निश्चितच विचार करायला लावणारी आहे.तीन गुन्हेगारांवर मोक्का२०१७ या वर्षभरात पोलिसांनी ४९ गुन्हेगारांना तडीपार केले तर ३ गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आला. या कालावधीत खुनाच्या गुन्ह्यांत ७३, बलात्काराच्या गुन्ह्यांत ९७ तर दरोड्याच्या गुन्ह्यांतील ३१ आरोपींना अटक झाली. दंग्यांच्या ८९ प्रकरणांत ३२४ आणि विनयभंगाच्या आरोपाखाली २१८ जणांना अटक झाली.