नागपूर : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील कटघोरा येथील १७ वर्षांची मुलगी इन्स्टाग्रामवर मध्य प्रदेशातील नुराबाद जि. मुरैना येथील २० वर्षाच्या युवकाच्या संपर्कात आली. चॅटिंग करीत असताना त्यांचे सुत जुळले. युवकाने तिला बिलासपूरला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. दोघेही राहुलच्या भावासोबत गोंडवाना एक्स्प्रेसने ग्वाल्हेरला जात असताना आरपीएफच्या जवानांनी त्यांना अटक करून नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. सोशल मीडियाचा दुरुपयोग करून पुन्हा एक अल्पवयीन मुलगी शोषणाची बळी ठरल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
राहुल ऊर्फ सागर बाथम (२०) रा. नुराबाद जि. मुरैना, मध्य प्रदेश आणि शैलेंद्र देवीराम बाथम (२१) रा. माधवनगर, मध्य प्रदेश हे दोघेही मामेभाऊ आहेत. राहुलचे इन्स्टाग्रामवर छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील कटघोरा येथील १७ वर्षाच्या विद्यासोबत (बदललेले नाव) ओळख झाली. ते नियमित चॅटिंग करू लागले. काही दिवसातच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसानंतर राहुलने विद्याला बिलासपूरला बोलावले. तेथे विद्याच्या गावातील मिंटो नावाचा युवक कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. विद्याच्या ओळखीने राहुल, त्याचा भाऊ मिंटोच्या खोलीवर दोन दिवस थांबले. तेथे राहुलने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर राहुल, त्याचा भाऊ आणि विद्या ग्वाल्हेरला निघाले होते. ते रेल्वेगाडी क्रमांक ०४०७९ गोंडवाना एक्स्प्रेसच्या कोच बी-४, बर्थ ५७, ६०, ६३ वरून प्रवास करीत होते. भंडारा ते नागपूर प्रवासात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक विनेक मेश्राम आणि आरपीएफ जवानांना त्यांच्यावर शंका आली. त्यांनी चौकशी केली असता राहुल आणि त्याच्या भावाने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु अधिक चौकशीनंतर त्यांनी घरून पळून जात असल्याची कबुली दिली. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरपीएफ जवानांनी नागपुरात तिघांनाही रेल्वे चाईल्ड लाईनच्या सुपूर्द केले. रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी तिघांनाही लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. लोहमार्ग पोलिसांनी विद्याची वैद्यकीय तपासणी करून अपहरण, बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. ही घटना बिलासपूर पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे हे प्रकरण बिलासपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले.
...................