राकेश घानोडे नागपूरपतीने स्वत:च्या पत्नीसोबत तिच्या मनाविरुद्ध किंवा बळजबरीने शरीरसंबंध ठेवणेही बलात्कार ठरू शकतो. हा खुलासा वाचून अनेकांना धक्का बसेल पण, बलात्काराच्या व्याख्येत यासंदर्भात अपवाद नमूद करण्यात आला आहे. पत्नी १५ वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर, तिच्यासोबत बळजबरीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्काराच्या व्याख्येत मोडतात. १५ वर्षांखालील मुलींच्या विवाहाचे प्रमाण १८ टक्के बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार विवाह करण्यासाठी मुलीचे वय १८ वर्षे तर, मुलाचे वय २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. ही बाब लक्षात घेता १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचा विवाह करणे गुन्हा आहे. परंतु, युनिसेफ (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड)च्या अभ्यासानुसार भारतातील ४७ टक्के मुलींचे विवाह १८ वर्षे वयापूर्वी तर, १८ टक्के मुलींचे विवाह १५ वर्षे वयापूर्वीच केले जातात. अशा विवाहामध्ये कुटुंबीयांकडून मुलींची परवानगी घेतली जात नाही. ही बाब लक्षात घेता भारतीय दंड विधानामधील बलात्काराच्या व्याख्येतला दुसरा अपवाद निश्चितच उपयोगी ठरतो. शिक्षेसंदर्भातील तरतुदीभारतीय दंड विधानामध्ये विविध परिस्थितीतील बलात्कारांसाठी द्यावयाच्या शिक्षेसंदर्भात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आरोपीला भादंविच्या कलम ३७६-१ (सामान्य परिस्थितीत बलात्कार) अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास ते जन्मठेप, ३७६-२ (सरकारी नोकराने त्याच्या ताब्यातील महिलेवर, कोणत्याही व्यक्तीने गर्भवती, अपंग व मानसिक रुग्ण महिलेवर, १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर केलेला बलात्कार) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास ते मरेपर्यंत जन्मठेप, कलम ३७६-बी (विभक्त पत्नीवर बलात्कार) अंतर्गत २ ते ७ वर्षांपर्यंत सश्रम कारावास तर, कलम ३७६-डी (सामूहिक बलात्कार) अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास ते मरेपर्यंत जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते.
पत्नीसोबत बळजबरीचे शरीरसंबंध बलात्कार
By admin | Published: May 14, 2015 2:39 AM