नागपूर : इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून सीआरपीएफमधून बडतर्फ झालेल्या जवानाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ एप्रिलला घडली आहे. पोलिसांनी बलात्कारसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपी बडतर्फ जवानास अटक केली आहे.
ब्रजेश तोमर (वय ३४, रा. हस्सपूर, अलीगढ, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या बडतर्फ सीआरपीएफ जवानाचे नाव आहे, तर पीडित २१ वर्षीय विद्यार्थिनी अमरावती येथील रहिवासी आहे. २०१९ मध्ये आरोपी ब्रजेशची पीडित विद्यार्थिनीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. १० फेब्रुवारी २०२३ रोजी आरोपी ब्रजेशला सीआरपीएफच्या नोकरीतून बडतर्फ करण्यात आले. आपण बडतर्फ झाल्याची बाब आरोपीने विद्यार्थिनीपासून लपवून ठेवली. ५ एप्रिल २०२३ रोजी आरोपी ब्रजेशने तरुणीला भेटण्यासाठी नागपुरात बोलावले. ती भेटल्यानंतर काही वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर तो तिला सीताबर्डीतील एका ओयो हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर काही दिवसांपूर्वी आरोपी ब्रजेशने विद्यार्थिनीला लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे समजताच विद्यार्थिनीने सीताबर्डी पोलिस ठाणे गाठून आरोपी ब्रजेशविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांनुसार आरोपी ब्रजेशविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांचे पथक आरोपीच्या गावाला गेले. हस्सपूर येथून आरोपीला अटक करून नागपुरात आणले. सीताबर्डी पोलिसांनी आरोपी ब्रजेशची गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे. पुढील तपास सीताबर्डी पोलिस करीत आहेत.
.............