गतीमंद महिलेवर बलात्कार, १२ वर्षांचा कारावास कायमच; हायकोर्टाचा नराधम आरोपीला दणका
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: August 10, 2023 02:16 PM2023-08-10T14:16:06+5:302023-08-10T14:18:54+5:30
आरोपीची १२ वर्षे सश्रम कारावासासह इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली.
नागपूर : धारदार चाकू मारण्याचा धाक दाखवून गतीमंद व दिव्यांग महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीची १२ वर्षे सश्रम कारावासासह इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिला. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील आहे.
नीलेश प्रभाकर जाधव (३६) असे आरोपीचे नाव असून तो सुनगाव वेस, ता. जळगाव जामोद येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित महिला ३८ वर्षांची होती. ती शेळ्यांकरिता चारा आणण्यासाठी निर्जन ठिकाणी गेली असता आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने भितीपोटी आरोपीच्या कुकृत्याची कोणालाही माहिती दिली नाही. दरम्यान, २८ ऑगस्ट २०१७ रोजी तिच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे कुटुंबियांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ती तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती दिली. परिणामी, सर्वांच्या पायाखालील जमीन सरकली.
कुटुंबियांनी पीडित महिलेला सखोल विचारपूस केली. त्यावेळी तिने आरोपीने बलात्कार केला होता, अशी माहिती दिली. डीएनए अहवालावरूनही पीडित महिलेच्या पोटातील बाळ आरोपीचे असल्याचे सिद्ध झाले. २ मे २०२२ रोजी सत्र न्यायालयाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता आरोपीला १२ वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड, अशी कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.