नागपूर : कुही पोलिसांच्या क्षेत्रामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गुरुवारी २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाचे न्या. शरद त्रिवेदी यांनी हा निर्णय दिला.
रामदास मारोती ठाकरे (५९) असे आरोपीचे नाव असून तो डोंगरगाव येथील रहिवासी आहे. पीडित मुलीस ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षाही सुनावण्यात आली आहे. आरोपीने दंडाची रक्कम जमा केल्यास त्यातील १० हजार रुपये पीडित मुलीला भरपाई म्हणून अदा करा, असा आदेश देखील न्यायालयाने सरकारला दिला.
पीडित मुलगी १३ वर्षे वयाची होती. २ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी २ च्या सुमारास ती गावाबाहेरील नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. आरोपी त्याच परिसरात शेळ्या चारत होता. पीडित मुलगी कपडे धुऊन घरी परत जात असताना आरोपीने अचानक तिचा हात पकडला आणि तिला ओढत निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केला. तसेच, हे कुकृत्य लपवून ठेवण्यासाठी तिला ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मुलीने घरी पोहोचल्यानंतर आईला आपबिती सांगितली. त्यानंतर आरोपीविरुद्ध कुही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. सोनाली राऊत यांनी कामकाज पाहिले. त्यांनी ठोस वैद्यकीय पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले.