लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पवयीन मैत्रिणीसोबत लग्नाचे आमिष दाखवून एका आरोपीने अडीच वर्षांत वारंवार शरीरसंबंध जोडले. आता लग्नाला नकार देऊन तिला मारहाण केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून, पोलिसांनी क्रिष्णा राजेश शर्मा (वय १९) याला मंगळवारी अटक केली.
आरोपी शर्मा हिंगणा मार्गावरील भीमनगरात राहतो. तो बारावीपर्यंत शिकलेला आहे. मात्र कसलाही कामधंदा न करता उनाडक्या करत फिरतो. त्याने दहावीची विद्यार्थिनी असलेल्या १६ वर्षीय मुलीसोबत मार्च २०१९ पासून प्रेमसंबंध जोडले. तो तिला इकडे तिकडे फिरायला नेत होता. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिच्याकडे वारंवार शरीरसंबंधाची मागणी करू लागला. त्यासाठी त्याने एका धार्मिक ठिकाणी नेऊन तिच्यासोबत लग्न करण्याचाही बनाव केला. अलीकडे तो टाळत असल्याचे लक्षात आल्याने तिने त्याला पत्नी म्हणून घरात घेऊन चलण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे आरोपी शर्मासोबत तिचे सोमवारी दुपारी १२.३० वाजता कडाक्याचे भांडण झाले. त्याने तिला मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणाचा बोभाटा झाला. नंतर मुलीने एमआयडीसी ठाण्यात शर्माविरुद्ध बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला. प्रभारी ठाणेदार उमेश बेसरकर यांनी आरोपी शर्माविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याची चाैकशी सुरू आहे.
----