लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने कोरोना निदानासाठी रुग्णांची रॅपिड अॅन्टी बॉडी बेस्ड ब्लड टेस्ट करण्याला हिरवी झेंडी दाखवली आहे. त्याकरिता पाच लाख किट्स तयार करण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.ही माहिती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. यासंदर्भात सी. एच. शर्मा व सुभाष झंवर यांच्या जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विदर्भामध्ये रॅपिड अॅन्टी बॉडी टेस्टला कधी सुरुवात होईल, अशी विचारणा करून यावर २३ एप्रिलपर्यंत माहिती सादर करण्याचा आदेश दिला. डॉ. अनुप मरार यांनी या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करून डॉ. रॅपिड अॅन्टी बॉडी टेस्टला सुरुवात करण्याची गरज स्पष्ट केली होती. त्यामुळे गेल्या तारखेला न्यायालयाने यासंदर्भात आवश्यक निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, केंद्र सरकारने या टेस्टला हिरवी झेंडी दाखवली. या चाचणीला पीसीआर चाचणीपेक्षा कमी खर्च व वेळ लागतो. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वात या चाचणीचा समावेश आहे.नवीन व्हीआरडीएलसाठी त्रुटी दूर केल्या का?अकोला, यवतमाळ, चंद्रपूर व गोंदिया मेडिकल येथे व्हीआरडीएल (व्हायरल रिसर्च अॅण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) सुरू करण्यासाठी काही त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यावर २३ एप्रिलपर्यंत उत्तर मागितले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने संबंधित त्रुटी काढल्या आहेत. कोरोना निदान तातडीने होण्यासाठी या मेडिकलमध्ये व्हीआरडीएल कार्यान्वित करण्याचा आदेश न्यायालयाने मार्चमध्ये दिला होता हे येथे उल्लेखनीय.
कोरोना निदानासाठी रॅपिड अॅन्टी बॉडी टेस्टला हिरवी झेंडी : हायकोर्टात माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 9:01 PM
केंद्र सरकारने कोरोना निदानासाठी रुग्णांची रॅपिड अॅन्टी बॉडी बेस्ड ब्लड टेस्ट करण्याला हिरवी झेंडी दाखवली आहे. त्याकरिता पाच लाख किट्स तयार करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देपाच लाख किट्स तयार, राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी