नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. अवघ्या सहा महिन्यांमध्ये नागपुरात सायबर शाखेत २,२७५ तक्रारी आल्या आहेत. त्यावरून याचा प्रत्यय यावा.लॉकडाऊनमुळे ऑनलाईन व्यवहाराला प्रत्येक जण प्राधान्य देत आहे. बहुतांश व्यक्ती आर्थिक व्यवहारही ऑनलाईनच उरकत आहेत. कामधंदे बंद झाल्यामुळे अनेक जण दिवसभर मोबाईलमध्ये गुंतून असतात. त्यातून ऑनलाईन सर्चिंग वाढली आहे. नेमका याचाच गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या पद्धतींनी गंडवण्याचा सपाटा लावला आहे. नागपुरात दर दिवशी सायबर शाखेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. १ जानेवारी ते १५ जुलै २०२० पर्यंत सायबर शाखेकडे २,२७५ तक्रारी आल्या असून त्यातील सर्वाधिक तक्रारी फसवणुकीच्या आहेत. केवायसी अपडेट, ऑनलाईन शॉपिंग, एटीएम क्रेडिट कार्ड ब्लॉक करणे, कार्ड क्लोनिंग, ओटीपी शेअरिंग, ऑनलाईन फंड ट्रान्सफर असे हे फसवणुकीचे नवनवे प्रकार आहेत; त्यानंतर सोशल मीडियाचा गैरवापर करणे, त्रास देणे, धमक्या देणे, अश्लील शिवीगाळ करणे, विनयभंग करणे, अश्लील फोटो पाठविणे, असेही गुन्हे घडत आहेत. सायबर शाखेत दाखल झालेल्या तक्रारींपैकी ११२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून २९ गुन्हे दाखल झाले आहेत. २७ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.नागपुरातील डॉक्टरची अमेरिकेत फेक ई-मेल आयडीनागपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि ‘कोम्हाड’ या आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेचे पदाधिकारी असलेले डॉ. उदय बोधनकर यांच्या नावे गेल्या आठवड्यात सायबर गुन्हेगारांनी अमेरिकेत बनावट ई-मेल आयडी तयार केली. त्यावरून चुकीचे मेल पाठवून अमेरिका, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलियासह विविध देशांतील डॉक्टरांना आर्थिक गंडा घातला. हे हाय प्रोफाईल प्रकरण सध्या वैद्यकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.