खापा : शासनाने प्रदूषणमुक्तीच्या नावावर गरीब नागरिकांना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे वितरण केले. त्यातच राॅकेल विक्री बंद केली. ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्रीच्यावेळी दिव्यांमध्ये टाकायला राॅकेल मिळत नसल्याने गरीब नागरिक त्रस्त झाले आहेत.
केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस याेजना राबवित गरिबांना गॅस कनेक्शन दिले. ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे, त्यांना राॅकेल देणेही बंद केले. त्यातच ग्रामीण भागात भारनियमन केले जात असून, वारंवार वीजपुरवठा खंडित हाेताे. रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यावर दिवे पेटविण्यासाठी गरिबांना राॅकेल मिळेनासे झाले आहे. त्यांना महागडे खाद्यतेल जाळून प्रकाशाची व्यवस्था करावी लागत असल्याने तसेच अंत्यसंस्काराला सरण जाळण्यासाठी राॅकेल मिळत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गरिबांना पूर्वीप्रमाणे शासनाने राॅकेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.