नागपूर : नायलाॅन मांजाच्या पतंगबाजीमुळे दरवर्षी पक्ष्यांवर येणारे संकट यावेळीही कायम आहे. जागृत पक्षिप्रेमींनी मांजात अडकून जखमी झालेले अनेक पक्षी उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (टीटीसी) आणले. यामध्ये धाेकाग्रस्त प्रजातीत समावेश असलेल्या एका दुर्मीळ ब्लॅक स्टाॅर्क (काळा बगळा)चाही समावेश हाेता.
शुक्रवारी पावसाने ब्रेक घेतल्यानंतर पतंगबाजांचा उत्साह शिगेला पाेहोचला. ‘ओ काट... ओ काट...’ म्हणत पतंग कापताना पक्ष्यांचेही हातपाय कटले. काही जागरूक नागरिकांनी मानवता दाखवत सात ते आठ जखमी पक्ष्यांना टीटीसीमध्ये उपचारांसाठी आणले. यामध्ये जखमी कबुतर, वटवाघूळ, बगळे, घार, आदी पक्ष्यांचा समावेश हाेता. सेंटरचे समन्वयक कुंदन हाते यांनी सांगितले, सुनील टेकाडे नामक व्यक्तीने काळा बगळा जखमी अवस्थेत सेंटरमध्ये आणला. त्याच्यावर सेंटरचे व्हेटर्नरी डाॅ. मयूर काटे, डाॅ. सैयद बिलाल यांच्या पथकाने उपचार सुरू केले. इतरही पक्ष्यांवर उपचार सुरू आहेत. डीसीएफ भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात विनित अरोरा, अविनाश लोंढे, सौरभ सुखदेवे, हरीश किनकर, शंकर हत्तीठेले, शुभम मगर, बंडू मगर, स्वप्निल भुरे, प्रयाग गणराज यांचे पथक सहकार्य करीत आहे.