नागपूर : कोरोनातून सावरत नाही तोच काही लहान मुलांमध्ये सुरुवातीला ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिन्ड्रोम’ (एमआयएस) हा आजार दिसून आला होता. सध्या या आजाराचे रुग्ण कमी झाले असले तरी ‘गुलियन बँरी सिंड्रोम’ (जीबीएस), ‘मेंदूज्वर’ व स्वादुपिंडाशी संबंधित दुर्मिळ आजाराचे रुग्ण दिसून येत आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होताच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनाशी मिळताजुळता ‘एमआयएस’ आजार बालकांमध्ये दिसून आला. शासकीयसह खासगी रुग्णालयात याचे सुमारे १०० वर रुग्ण आढळून आले होते. परंतु नंतर हा आजार कमी झाला. सध्या डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. सोबतच काही दुर्मिळ आजाराचे रुग्णही आढळून येत आहेत. याची संख्या फार कमी असली तरी बालकांमध्ये दिसून येणाऱ्या कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका, तातडीने बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे आवाहन बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी केले आहे.
- काय आहे ‘जीबीएस’
डॉ. खळतकर म्हणाले, ज्या रुग्णांना कोरोना होऊन गेलेला आहे, त्यांच्यातील एक-दोन बालकांमध्ये ‘जीबीएस’ या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास याची पटकन लागण होते. मज्जातंतू हळूहळू निकामी करून आजाराचा विषाणू बोट, पाय, हात, फुफ्फुस, श्वसन नलिकेवरही हल्ला चढवतो. रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते. अनेकदा श्वास घेण्यासही अडचणी निर्माण होते. वेळीच निदान व उपचार झाल्यास यातून रुग्ण बरा होऊ शकतो.
- स्वादुपिंडाशी संबंधित आजार
कोरोना होऊन गेलेल्या जवळपास १० च्यावर रुग्णांना स्वादुपिंडाशी संबंधित आजार दिसून आला आहे. यात पोट फुगणे, जलाेदर (असायटिस) म्हणजे पोटात पाणी भरणे, पोटात फार दुखणे, यकृतावर सूज येणे आदी लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत.
- मेंदूज्वराचे ८ ते १० रुग्ण
डॉ. खळतकर म्हणाले, कोरोनानंतर ८ ते १० बालकांना मेंदूज्वराची लक्षणे आढळून आली. परजीवी, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगसमुळे हा रोग होऊ शकतो. ज्यामुळे मेंदू आणि मणक्याच्या हाडावर परिणाम होतो. या आजारात रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. जर मूल सतत रडत असेल, श्वास असामान्य असेल, चेहऱ्यावर छोटे छोटे पुरळ, बाळ दूध पित नसेल, हालचाल करीत नसेल तर त्वरित डॉक्टरांना भेटायला हवे. मोठ्या मुलांमध्ये ताप, उलटी, मळमळणे, मान अकडणे, पेशींमध्ये वेदना होणे, डोकेदुखी, श्वास वेगाने सुरू राहणे, कंपन यासारखी लक्षणे दिसून येतात.