अनिल नायर : कायद्यावर सीए संस्थेतर्फे चर्चासत्र नागपूर : ‘रेरा’ कायद्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणि शिस्त येणार आहे. या कायद्याची १ मेपासून अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र राज्य देशात पहिले आहे. नोंदणीसाठी आॅनलाईन पोर्टल तयार आहे. ‘रेरा’ कायदा ‘रिअल इस्टेट’ क्षेत्राकरिता मैलाचा दगड ठरणार असून यामुळे बांधकाम क्षेत्राचे चित्र बदलेल, असा विश्वास नागपूर क्रेडाई मेट्रोचे अध्यक्ष अनिल नायर यांनी येथे व्यक्त केला. ‘रेरा’ कायद्याची विस्तृत माहिती करून देण्याच्या उद्देशाने आयसीएआयच्या नागपूर सीए संस्थेतर्फे तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन संस्थेच्या धंतोली येथील सभागृहात करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. नायर म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांना ९० दिवसांत नोंदणी करायची आहे. लोकांना माहिती होण्यासाठी प्रकल्पाची वैशिष्ट्ये आाणि ताबा देण्याची तारीख नमूद करायची आहे. या कायद्यामुळे बांधकाम क्षेत्राची समीकरणे बदलणार आहे. हा कायदा बांधकाम व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी असल्याचे नायर यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कायद्यातील तरतुदी समजावून सांगितल्या. हा कायदा दुबई आणि इंग्लंडमध्ये लागू झाल्यानंतर झालेल्या बदलांची माहिती त्यांनी दिली. आर्किटेक्ट आणि चार्टर्ड अकाऊटंटनी कायद्यातील तरतुदींचे पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र के्रडई मेट्रोचे उपाध्यक्ष महेश साधवानी यांनी कायद्याचे स्वागत केले. त्याचा फायदा बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तसेच ग्राहक व विक्रेत्यांना होणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्रातील लोकांना या कायद्याचा फायदा होऊन व्यवसायात पारदर्शकता येणार आहे. हा कायदा प्रारंभिक टप्प्यात असल्यामुळे व्यावसायिकांनी चौकस राहावे आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रास्तविक नागपूर सीए संस्थेचे उपाध्यक्ष उमंग अग्रवाल यांनी केले. ते म्हणाले, या कायद्यामुळे विक्रेत्यांची जबाबदारी निश्चित होणार आहे. त्यामुळे व्यवसायात पारदर्शकता येईल आणि वेगाने विकास होईल. तांत्रिक सत्रात पुणे येथील सीए विनीत देव यांनी कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. कायद्याचे पालन करण्याचे आवाहन बिल्डर्सला केले. या कायद्यामुळे प्रॉपर्टीची खरेदी-विक्री सुलभ होणार आहे. पुणे येथील सीए प्राजक्ता शेटे यांनी या कायद्यांतर्गत सीएची भूमिका स्पष्ट केली. संचालन सचिव सुरेन दुरगकर यांनी केले. नागपूर क्रेडाई मेट्रोचे सचिव गौरव अगरवाला यांनी आभार मानले. संस्थेचे कोषाध्यक्ष कीर्ती कल्याणी आणि जीतेन सागलानी यांनी सत्राचे समन्वयन केले. याप्रसंगी आयसीएआयच्या पीआर व सीएसआर समिती सदस्य जुल्फेश शाह, स्वप्नील घाटे, साकेत बागडिया, रवींद्र लक्षरे, गौरव अग्रवाल, शिशिर दिवटे, तेजिंदरसिंग रेणू, सुनील दुड्डलवार, विश्वास गुप्ता, राहुल अग्रवाल, प्रणव मोर प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
‘रेरा’ कायद्यामुळे बांधकाम क्षेत्राचे चित्र बदलणार
By admin | Published: May 03, 2017 2:31 AM