लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागातील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आल्यामुळे, वन्यजीव आता शहरातील रहिवासी भागात आढळत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. शनिवारी रात्री दिघोरी येथील मयूर श्रीरामे यांच्या घरी एक दुर्मिळ पेंगोलिन (खवल्या मांजर)आढळला. घरात अचानक आढळलेला पेंगोलिन बघून श्रीरामे परिवार घाबरला. पेंगोलिनला बघण्यासाठी परिसरातील लोकही गोळा झाले होते. काही लोकांनी याची माहिती सर्पमित्र मोनू सिंह यांना दिली. मोनू सिंह यांनी आशिष मेंढे, मयूर कुरटकर, निखील नागपूरे, पीयूष पुरी यांना घटनास्थळी पाठविले. सेमिनरी हिल्सची ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची रेस्क्यू टीमदेखील दिघोरीत पोहचली. वन कर्मचारी व सर्पमित्रांच्या टीमने पेंगोलिनला पकडले. पेंगोलिन शेड्यूल-१ मध्ये येत असल्याने वनरक्षक ए. एस. कातकडे यांनी पंचनामा करून ताब्यात घेतले. त्यानंतर पेंगोलिनला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणण्यात आले.
- शिकार, तस्करीचे प्रमाण जास्तपेंगोलिनच्या शरीराची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने त्याची शिकार केली जाते. त्यामुळे पेंगोलिनची संख्या कमी होत आहे. त्यामुळे पेंगोलिनला वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये शेड्यूल प्राण्यांच्या यादीत नोंदविण्यात येते. पेंगोलिन घनदाट जंगलात वृक्षांच्या मुळालगत बीळ करून मुंग्या व उधई व किडे खातो.