अंकीता देशकर
नागपूर : भोसले राजवटीतील कर्तबगार योद्धा म्हणून आणि वडिलांच्या निधनानंतर सेनासाहेब सुभा म्हणून गादीवर आलेले जानोजीराव भोसले (१७५५-१७७२) यांचे दुर्मिळ चित्र फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेल्या बिब्लिओथिक नॅशनल डी फ्रान्स (बीएनएफ) या राष्ट्रीय संग्रहालयात आढळून आले आहे. शहरातील युवा इतिहासकार अथर्व शिवणकर याने हे चित्र शाेधून काढले आहे.
फ्रान्समध्ये सापडलेल्या या चित्रात रत्नजडित घोड्यासह शाही वस्त्र परिधान केलेला अश्वारूढ मराठा राजा दिसतो. त्यावर ‘डायनोजी’ असे नाव कोरलेले आहे. त्यावरून या चित्रातील व्यक्त जानोजी भोसले आहेत, हे सिद्ध होते. विशेष म्हणजे, मराठवाडा विद्यापीठातील एका हिल कलेक्शनमध्ये पेशवा नानासाहेबांसोबत आणि अमेरिकेतील सॅन दिएगो संग्रहालयात सेम टू सेम असे चित्र आढळून येते. त्यावरून बीएनफमधील चित्र जानोजींचे असल्याचे सिद्ध होत असल्याचे अर्थव म्हणाला. बीएनफमधील ही पेंटिंग लघुचित्राचा उत्तम नमुना असून, नागपूरच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. या संग्रहालयात जतन करण्यात आलेले हे चित्र अजून कुठेही प्रकाशित झालेले नाही. मात्र, त्यांच्या संकेतस्थळावरून ते डाऊनलोड करणे शक्य असल्याचेही त्याने सांगितले.
पाँडिचेरी, फैजाबाद ते पॅरिस
फ्रान्सचा चित्रकार जीन बाप्टिस्ट जेंटिल याच्या आर्टवर्क कलेक्शनचा एक भाग म्हणजे ही पेंटिंग होय. त्याची नियुक्ती पाँडिचेरी व नंतर फैजाबादमध्ये नवाबाच्या दरबारात झाली. जेंटिलने १७८८ मध्ये फ्रान्सला परतताना अनेक हस्तलिखिते व आर्टवर्कचे अल्बम सोबत घेतले. अशा तऱ्हेने जानोजी भोसले यांची ही पेंटिंग पॅरिसमध्ये पोहोचली.
मी जगभरातील विविध संग्रहालयांची संकेतस्थळे (वेबसाईट) शोधत असतो आणि त्यातील भारतीय ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करत असतो. त्याच श्रुंखलेत बीएनएफ पॅरिसमध्ये ही पेंटिंग आढळली.
- अथर्व शिवणकर, युवा इतिहासकार, नागपूर