लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हृदयापासून रक्ताला शरीराच्या दुसऱ्या भागात पाठविणाऱ्या महाधमणीमध्ये रक्ताचा दाब वाढल्याने धमणीच्या आतील पहिला स्तर म्हणजे ‘इन्टीमा’ फाटून ‘मेडीआ’ व ‘अॅडव्हेंशीआ’ या दोन स्तरातून रक्तपुरवठा होत असल्याने धमणी फुटून रुग्णाचा मृत्यू होण्याची भीती होती. रुग्ण प्रत्येक तासाला एक टक्का मृत्यूकडे ओढला जात होता. तातडीने शस्त्रक्रिया न झाल्यास तीन दिवसांत रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका होता. अत्यंत गुंतागुंतीची असलेली ‘अॅरोटिक असेन्डिंग डिसेक्शन’ ही शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सीव्हीटीएस विभागाचे प्रमुख डॉ. निकुंज पवार व त्यांच्या चमूने करण्याची जबाबदारी घेतली. तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. विशेष म्हणजे, रुग्णाचे हृदय बंद पाडून, ४० मिनिटे रक्तभिसरण थांबवून महाधमणीवर शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान दिले.बुटीबोरी येथे भाजीपाल्याचा व्यवसाय करणारा विजय पुंड (४५) यांना गेल्या काही दिवसांपासून हृदयात तीव्र वेदना व श्वास घेण्यास अडचण जात होती. ४ सप्टेंबर रोजी नातेवाईकांनी पुंड यांना मेडिकलमध्ये दाखल केले. रुग्णाची प्रकृती पाहता दुसºयाच दिवशी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सा विभागात (सीव्हीटीएस) स्थानांतरित केले. डॉ. पवार यांनी पुंड याची तपासणी केल्यावर दुसºयाच दिवशी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. रुग्ण गरीब असल्याने व त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे असल्याने हे प्रकरण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेकडे मंजुरीसाठी पाठविले, दुसºया दिवशी या योजनेतून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक निधीची तरतूद होताच शस्त्रक्रियेला सुरुवात केली. तब्बल आठ तास शस्त्रक्रिया चालली. डॉ. पवार यांनी आपले अनुभव व कौशल्य पणाला लावत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. अत्यंत दुर्मिळ आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पहिली ‘अॅरोटिक असेन्डिंग डिसेक्शन’ ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. या शस्त्रक्रियेत बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. विजय श्रोते, डॉ. अमरीश खटोड, डॉ. चंदनकुमार रायमहापात्र, डॉ. प्रचिती शेंडे, डॉ. विनय शिंपी, परिचारिका एम. गायकवाड, ए. हाडके, एस. चांभारे, के. विंचुरकर, एम. मारडे, एस. जामदार व बी. संदलवार आदींचे विशेष सहकार्य मिळाले.उर उघडल्यास धमणी फुटण्याची शक्यता होतीशस्त्रक्रियेची गुंतागुंत सांगताना डॉ. पवार म्हणाले, हृदय शस्त्रक्रियेमध्ये उर उघडणे ही सामान्यपणे पहिली पायरी असते. परंतु या रुग्णाच्याबाबतीत असे करणे शक्य नव्हते. कारण हृदयाच्या पातळ पिशवीत रक्त जमा होऊन ते निळे पडले होते. यामुळे पायाच्या रक्तवाहिनीतून बायपास करण्याच्या पद्धतीचा वापर केला. ‘बेन्टॉल प्रोसिजर’च्या मदतीने रुग्णाच्या उजव्या मांडीतील उर-धमणी आणि उर-शीरा या दोन्हीतून ‘कॅन्युला’ (नळी) टाकण्यात आली. रुग्णाला ‘कार्डिओ पल्मोनरी बायपास’ यंत्रावर ठेवण्यात आले. शरीराचे तापमान ३६ डिग्रीपासून सुरू करून हळूहळू १८ डिग्री सेल्सियसपर्यंत नेण्यात आले. या तापमानावर हृदय स्पंदन थांबते आणि आंकुचन होते. ही प्रक्रिया होताच शरीरातील रक्ताभिसरण पूर्णपणे थांबवण्यात आले. रुग्णाच्या शरीरातील संपूर्ण रक्त ‘हार्ट लंग’ यंत्रातील ‘व्हिनस रिझर्व्हायर’मध्ये साठवण्यात आले. रक्त पुरवठ्याच्या अभावामुळे होणाऱ्या क्षतीपासून मेंदूचे संरक्षण करण्यासाठी सगळी काळजी घेण्यात आली. ठरल्याप्रमाणे दोन्ही धमणी काढून टाकल्या. त्या ठिकाणी कृत्रिम धमणीचे रोपण करून मुख्य महाधमणीला जोडले. धमणीतून रक्तप्रवाह सुरू करण्यात आला. रुग्णाला पुन्हा उष्ण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शरीराचे तापमान सामान्य होताच हृदयाचे स्पंदन पुन्हा सुरू झाली. रक्तभिसरण बंद असण्याचा कालावधी ४० मिनिटांचा होता. हळूहळू मेंदूच्या मज्जासंस्थेत सुधारणा झाली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात येईल, असेही डॉ. पवार म्हणाले.