लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जन्मत:च बाळाला हृदयाचा दुर्मिळ आजार होता. हृदयातून अशुद्ध रक्त शरीरात वाहत असल्याने जीव धोक्यात आला होता. तातडीने हृदय शस्त्रक्रियेची गरज होती. परंतु ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट व गुंतागुंतीची होती. त्यात तीन दिवसांच्या बाळावर शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. परंतु बालरोग हृदय शल्यचिकित्सक डॉ. संदीप खानजोडे व सीटीव्हीएस सर्जन डॉ. आनंद संचेती या दोन डॉक्टरांनी आपले अनुभव व कौशल्य पणाला लावून ही शस्त्रक्रिया यशस्वी करून बाळाला जीवनदान दिले.
या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘ट्रान्स्पोझिशन ग्रेट आर्टरीज’ म्हणतात. प्राप्त माहितीनुसार, २७ वर्षीय एका महिलेने २० मार्च रोजी एका खासगी हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. परंतु बाळाच्या जन्माच्या काही तासानंतर बाळ निळे पडायला लागले. डॉक्टरांनी उपचाराला सुरुवात केली. परंतु प्रकृती गंभीर होत होती. यामुळे तातडीने न्यू इरा हॉस्पिटलमध्ये बाळाला आणि तिच्या आईला भरती केले. हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांनी बाळाला तपासून ‘ट्रान्स्पोझिशन ग्रेट आर्टरीज’ असल्याचे निदान केले. डॉ. संचेती यांनी ‘लोकमत’ला सांगितले, हा एक दुर्मिळ आजार आहे. यात हृदयातून शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होण्याऐवजी अशुद्ध रक्ताचा पुरवठा होतो, तर फुप्फुसाला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन बाळ निळे पडत होते. तातडीने हृदयावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. परंतु ही अधिक गुंतागुंतीची व किचकट शस्त्रक्रिया तीन महिन्यांच्या बाळावर करणे जोखमीचे होते. रुग्णाच्या कुटुंबाच्या संमतीने ही ‘ओपन हार्ट सर्जरी’ करण्यात आली. सलग आठ तास शस्त्रक्रिया चालली. अनुभव व कौशल्याच्या बळावर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. अशा शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला एक महिना तरी रुग्णालयात राहावे लागते. परंतु या प्रकरणात तीन दिवसांतच बाळाचा कृत्रिम श्वासोच्छ्वास काढण्यात आला. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचेही ते म्हणाले.
ही शस्त्रक्रिया डॉ. खानजोडे व डॉ. संचेती यांनी मिळून केली. यात बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. साहिल बन्सल, डॉ. स्नेहा निकम, डॉ. दर्शन सोनी, डॉ. विजय लांजे, डॉ. स्वप्निल भिसीकर, डॉ. मनीष चोखांद्रे, हॉस्पिटलचे संचालक डॉ. नीलेश अग्रवाल व डॉ. निधीश मिश्रा यांचे विशेष सहकार्य मिळाले.